इतर

राळेगणसिध्दी पंचक्रोशीत अशिक्षित मेंढपाळाने महसूल च्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडला!

८ हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहात पकडला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पारनेर : प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तलाठी कार्यालयात लाचखोरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे

नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी टाकलेल्या छापा कारवाईत कामगार तलाठी दिपक भिमाजी साठे वय ३६ (रा. हंगा, ता. पारनेर ) याला ८ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

जमीन खरेदीची नोंद सातबा उताऱ्यावर करण्यासाठी लाच मागणीचा हा प्रकार घडला असून आरोपी विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदाराने कुरूंद येथील गट नंबर ९६ मधील १ एकर २० गुंठे शेतजमीन आपला मुलगा सख्खा भाऊ आणि पुतण्याच्या नावावर चुलत भावाकडून १० ऑक्टोबर २०२३ रोजी खरेदी केली होती. या जमीनीवर तक्रारदाराच्या चुलतभावाचे एका पतसंस्थेचे कर्ज होते. ते कर्ज चुलत भावाने खरेदीखत होण्यापूर्वी पतसंस्थेत भरले होते. मात्र चुलत भाऊ व सबंधित पतसंस्था यांच्यात कर्जाची परतफेड केल्याबाबत रिकन्व्हेन्स डिड झाले नसल्याने सदर कर्जाचा बोजा सात बारावरून उतरवलेला नव्हता. इतर हक्कात कर्जाच्या बोजाची नोंद दिसत असल्याने तक्रारदाराचा मुलगा, भाऊ तसेच पुतण्याच्या नावाची सात बारावर नोंद लावण्याकरता अडचण येत होती. त्यामुळे २६ ऑगस्ट २०२५ रोजी पतसंस्था व चुलत भाऊ यांच्यात कर्जाची परतफेड केल्याबाबत रिकन्व्हेन्स डिड करण्यात आले. त्याची नोंद २ सप्टेंबर २०२५ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली. या डिडच्या आधारे सात बारावर नोंद करण्याची तक्रारदाराची तलाठी साठे याच्याकडे मागणी होती.

दि.९ सप्टेंबर रोजी तक्रारदार वाडेगव्हाण येथील तलाठी कार्यालयात सात बारावर नोंद लावण्यासाठी खरेदीखताचा व रिकन्व्हेन्स डिडचा फेरफार घेऊन कार्यवाही करण्याची विनंती करण्यासाठी आरोपी साठे याच्याकडे गेले होते. कुरूंदचा पदभार सध्या माझ्याकडे नाही तो शिंगाडे मॅडम यांच्याकडे आहे. त्या नवीन असल्याने त्यांच्याकडे ऑनलाईन फेरफार घेण्यासाठी डीजीटल सही नसल्याचे सांगून कुरूंद गावातील फेरफार माझ्याच डिजीटल सहीने ऑनलाईन घेत असल्याचे साठे याने तक्रारदारास सांगितले. आणि तिघांची नावे सातबारावर लावण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच तक्रारदाराकडे तलाठी साठे याने मागितली.

सात बारावर नोंदीसाठी कोणत्याही शासकीय फी ची आवष्यकता नसल्याचे तक्रारदारास माहीती होते. माझ्याकडे पैसे नाहीत असे तक्रारदाराने सांगत त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पोहच देण्याची मागणी केली. मात्र तलाठी साठे याने पोहच देण्यास साफ नकार दिला. त्यामुळे तक्रारदाराने तलाठी लाचेची मागणी करत असल्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिंबधक विभागाच्या वतीने उपपधिक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. त्यात पोलिस अंमलदार चंद्रकांत काळे,शेखर वाघ, किशोर कुळधर व चालक दत्तात्रय लाड यांचा समावेश होता. त्यांनी योजनाबध्द पध्दतीने सापळा लावला. वाडेगव्हाण येथे पथक पोहचल्यानंतर तक्रारदाराची तक्रार घेण्यात आली. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तक्रारदार व त्यांचा मुलगा तलाठी कार्यालयात पोहचले. त्यावेळी साठे याने त्या दिवशी बोललो ते आणून द्या. त्यावर तक्रारदाराने काय अशी विचारणा केली असता परत परत काय बोलायचे, मी दहा म्हणालो होतो तुम्हाला तुम्ही काहीतरी आठ हजार म्हटले होते, देऊन टाका आठ हजार करून देतो आज. सगळं करून घेऊ, दोन-तीन नोंदी आहेत. सगळं व्यवस्थित करून देतो अशी ग्वाही लाचखोर साठे देत होता, व ते सर्व लाचलुचपत विभागाच्या रेकॉर्डवर रेकॉर्ड होत होते. आठ हजार रूपये आणून देतो असे तक्रारदाराने सांगत किती वाजेपर्यंत तुम्ही कार्यालयात आहात अशी विचारणा करण्यात आली असता पाच वाजेपर्यंत कार्यालयात असल्याचे साठे यांने सांगितले. पैसे घेऊन येतो असे सांगत तक्रारदार पुन्हा लाचलुचपच्या पथकाकडे गेले. त्यावेळी रेकॉर्डरमध्ये झालेले संभाषण पडताळण्यात आले.

आणि साठे रंगेहात पकडला

तलाठयाने सांगितल्याप्रमाणे तक्रारदार त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता तलाठी कार्यालयात गेले. त्यापूर्वी ॲन्थ्रासिन पावडर आठ हजार रूपये तक्रारदाराकडे देण्यात आले होते. तक्रारदाराकडे व्हाईस रेकॉर्डर होतेच. कार्यालयाजवळ गेल्यानंतर तलाठी साठे यास फोन करू आम्ही कार्यालयात आल्याचे सांगितल्यानंतर साठे तिथे हजर झाला. वीज नाही, नाहीतर लगेच फेर टाकून दिला असता असे तो म्हणाला. त्यावर किती द्यायचे अशी विचारणा तक्रारदाराने केल्यानंतर झाले ना बोलणे आता काय परत ? अशी विचारणा साठे याने केली. त्यावर तक्रारदाराने खिशातील आठ हजार रूपये काढून तलाठी साठे याच्या हाती दिले. साठे याने रक्कम खिशात ठेवताच तक्रारदाराने इशारा केला. त्याचवेळी पथकाने साठे यास रंगेहात पकडले.

सुपा पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लाचलुचपत विभागाकडून सुरू आहे. दोष सिध्द झाल्यास आरोपीस किमान तीन ते सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

या कारवाईमुळे पारनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. महसूल खात्यातील लाचखोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक यांना दररोज येणाऱ्या महसूल कामांमध्ये लाच मागणीची प्रथा बंद करण्यासाठी अशी धडक कारवाई सातत्याने व्हावी अशी जोरदार प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार करा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही विभागाने स्पष्ट केले.

मेंढपाळ, शेतकरी, सर्वसामान्य माणसांकडून सरकारी अधिकारी व कर्मचारी सर्रास लाचेची मागणी करतात. ही अत्यंत लाजिरवाणी व अन्यायकारक बाब आहे. अशा भ्रष्ट अधिकारी, कर्मचा-यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या कारवाईतून स्पष्ट संदेश गेला पाहिजे की, यापुढे कोणतही अधिकारी वा कर्मचारी जनतेकडून लाच मागण्याचे धाडस करणार नाही. तसेच यापुढे कोणत्याही मेंढपाळ, शेतकरी वा सर्वसामान्य माणसाला सरकारी अधिकारी, कर्मचारी विनाकारण लाचेची मागणी करत असेल तर त्यांना आम्ही विनामुल्य कायदेशीर मदत करण्यास सदैव तयार आहोत

.ॲड. तुषार कुलाळ, ॲड. निळकंठ कुलाळ ॲड. कुलाळ,

कुलाळ असोसिएटस, पारनेर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button