नारायणगव्हाण येथे शिव पाणंद कार्यशाळा उत्साहात संपन्न

“
छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानात नोंद झालेल्या सर्व शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करा -पवळे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतरस्त्यांवर आधारित शिव पाणंद कार्यशाळा उत्साहात पार पडली.
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांच्या मूलभूत प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी “शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी” हा नारा देत पवळे यांनी प्रशासकीय आणि न्यायालयीन संघर्षाच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती व जनआंदोलन उभारले. या चळवळीमुळे हजारो शेतकऱ्यांची फौज उभी राहून शासनाचे लक्ष वेधले गेले आणि अनेक ऐतिहासिक निर्णयांना गती मिळाली.
पवळे म्हणाले की, “जोपर्यंत माझ्या शेवटच्या भावाला दर्जेदार शेतरस्ता मिळत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही.”
या दृढ निश्चयातून राज्यभर बंधुभाव, विकास आणि समृद्धीचा महामार्ग उभा झाला आहे. शासननिर्णयांची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याची आहे, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानात नोंद झालेल्या सर्व शेतरस्त्यांच्या सीमांकनाचा प्रत्यक्ष पाठपुरावा ग्रामपातळीवर झाला पाहिजे. ग्रामपंचायत, ग्रामसमिती आणि ग्रामस्थांनी मिळून या रस्त्यांच्या हद्दी निश्चित करून मजबुतीकरणासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.”
गावागावातील रस्त्यांची यादी तयार करून त्यांच्या सीमांकनाचा व अंमलबजावणीचा पाठपुरावा झाल्यास ‘रोड मॉडेल व्हिलेज’ आणि ‘स्मार्ट व्हिलेज’ या संकल्पना प्रत्यक्षात साकार होतील, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेदरम्यान रस्त्यांशी संबंधित तक्रारी, प्रलंबित कामे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काही रस्ते खुल्या झाल्याचे सांगण्यात आले. तसेच चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
पवळे म्हणाले, “गाव तेथे समृद्धी, शेत तेथे रस्ता — ही चळवळ थांबणार नाही. ही आपल्या भावी पिढ्यांसाठी समृद्धीचा पाया ठरेल.”
या कार्यशाळेसाठी विजया शेळके, सुभाष शेळके, हरीभाऊ नरसाळे, नवनाथ घुले, संजय साबळे, बबन गुड, दशरथ वाळूज, भाऊसाहेब वाळूंज, गणेश गाडे, जालींदर रासकर, राजेंद्र रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.



