इतर

दर्जेदार शिक्षणामुळे जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा – रामदास फुले


अहिल्यानगर : प्रतिनिधी

नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेत पहिल्यांदाच प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे पहिले पाऊल ,औक्षण करून, गुलाबपुष्प देत आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यामध्ये पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
शाळेचा परिसर आकर्षक सजावटीने नटला होता. नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधानामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते. शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस संस्मरणीय ठरला.


यावेळी तालुका कृषी अधिकारी उस्मान शेख मुख्याध्यापिका आशा ढोले ,बाळासाहेब कापसे, बाळू नवले, सविता गोरे ,नूतन पाटोळे, माजी सरपंच दिलीप होळकर, उपसरपंच एकनाथ जपकर सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, अमोल चौगुले, हनुमंत साळवे, माजी चेअरमन विलास जपकर, नितीन कदम, मारुती चौगुले यांच्यासह ग्रामस्थ, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळांमध्ये आज गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने कार्य करत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील पालकांचा जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असून मुलांचा कल या शाळांकडे वाढताना दिसत आहे. दर्जेदार शिक्षणामुळे जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा व पालकांचा ओढा वाढत आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, “शिक्षण हक्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण न देता त्यांना सक्षम, आत्मविश्वासू आणि स्वतःच्या पायावर उभे राहणारे नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षक करत आहेत. समाजाच्या प्रगतीसाठी दर्जेदार शिक्षण हाच सर्वात प्रभावी मार्ग असून जिल्हा परिषद शाळा ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी निर्माण झाली असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button