शेतकऱ्यांच्या कष्टाला आदराची नितांत गरज – खासदार छत्रपती शाहू महाराज :

अकोले प्रतीनिधी
शिवरायांचे राज्य हे ‘न्याया’चे होते. आजच्या व्यवस्थेतही त्याच न्यायाची,पारदर्शकतेची, शेतकऱ्यांच्या कष्टाला आदराची नितांत गरज आहे. आजच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शिवाजी महाराजांच्या नीतिमत्तेचा अंगीकार करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केले.
कोतुळ ता अकोले (अहिल्यानगर ) येथील बापूसाहेब देशमुख लिखित ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’ या मराठी, तर ‘द पायोनिअर ऑफ मराठा एम्पायर : छत्रपती शिवाजी महाराज’ या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
पुण्यात श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी’च्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीत शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, इतिहास लेखक डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास लेखक डॉ. श्रीमंत कोकाटे, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष प्रा. एस. झेड. देशमुख, उद्योजक रोहिदास दांगट, बाबाराजे जाधवराव ,अजित देशमुख,सुरेशराव कोते उपस्थित होते.

रयतेचे राज्य म्हणजे केवळ लोकप्रिय घोषणां नसून, ती एक जबाबदारी आहे. स्वराज्यनिर्मिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हा केवळ इतिहासाचा भाग नसून, तो अखंड प्रेरणेचा स्रोत आहे. महाराजांच्या विचारांचा वारसा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आजच्या काळात आवश्यक असल्याचे सांगत शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहू न शकल्याने त्यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला
शिवरायांनी अवघ्या १२ व्या वर्षी वडिलांच्या विखुरलेल्या जहागिरीला सावरून, सर्व जातिधर्माच्या रयतेला एकत्र करत स्वराज्य उभारले. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून उभारलेले हे राज्य आजही जगासाठी आदर्श आहे.
– पांडुरंग बलकवडे, इतिहास संशोधक

प्रास्ताविक रोहिदास दांगट, तर सूत्रसंचालन मुकुंद काकडे यांनी केले.
============


