इतर

नेप्ती मंडळातील लाभार्थ्यांना महाराजस्व शिबिरात विविध योजनांचा लाभ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


अहिल्यानगर | प्रतिनिधी

-राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा आणि महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा जागेवरच निपटारा व्हावा, या उद्देशाने भाळवणी येथील नंदनवन लॉन्स येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात पार पडले. या शिबिरात पारनेर विधानसभा मतदारसंघातील तसेच नगर तालुक्यातील नेप्ती मंडळातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेत विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला

शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमातून महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासली नाही. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने लाभार्थ्यांनी शासन व प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.

शिबिरामध्ये नवीन शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, अभिलेख दुरुस्ती, वारस नोंदी, पोट खराबा जमीन लागवडीखाली आणणे, अज्ञान पालकत्व कमी करणे आदी महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांना देण्यात आला. या शिबिरात रामदास अर्जुन जपकर, बाबासाहेब सखाराम होळकर, बाळासाहेब नामदेव कोल्हे, विजय पोपटराव होळकर ,सुयश तात्यासाहेब कर्डिले, मिराबाई सुरेश धोत्रे, मुन्नाबी रिजवान शेख, शारदा साहेबराव काळे, छाया साहेबराव काळे , साहिल हमीद सय्यद, कोकिळा शांताराम काळे या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमामुळे लाभार्थ्यांची प्रलंबित कामे मार्गी लागल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत शासन व महसूल प्रशासनाचे आभार मानले.



यावेळी पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष पात्र नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा समाधान शिबिरांमुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.



या प्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे, अहिल्यानगरचे तहसीलदार मिलिंद कुलथे, नेप्ती मंडळ अधिकारी प्रताप कळसे, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, ग्राम महसूल अधिकारी सुवर्णा रांधवन, विनायक दिक्षे, दिपक झेंडे, श्रीकृष्ण निमसे, दिपाली विधाते यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शिबिरादरम्यान नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनेक लाभार्थ्यांना जागेवरच प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे व आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च दोन्हीची बचत झाली.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. अशा उपक्रमांमुळे शासनाच्या लोककल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचत असून नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button