ध्रुवीकरण राजकारण आणि मतचोरी हा भाजपचा अजेंडा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

लोकशाहीची हत्या व व्होटचोरी यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले
पुणे – सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून कोणत्याही थराचे राजकारण केले जात असून धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपचा मुख्य अजेंडा झाला आहे. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना आज उघडपणे धर्माचे राजकारण केले जात असून लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्यांनी यावेळी केले.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित सेवा,कर्तव्य,त्याग सप्ताह कार्यक्रमात लोकशाहीची हत्या व व्होटचोरी यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, कार्यक्रमाचे संयोजक आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, महिला काँग्रेस शहराध्यक्ष स्वाती शिंदे, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, लता राजगुरू, कैलास गायकवाड, अनिल सोडकर आणि चेतन अग्रवाल उपस्थित होते.

ईव्हीएम बाबत शंका निर्माण झाल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पुणेकरांचे मोठे योगदान आहे. लोकशाहीचा मूलभूत पाया वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे येणे आवश्यक आहे. असे सांगून थोरात म्हणाले भाजपने तांत्रिक साधने,अफवा आणि जातीय धुर्वीकरणाचा वापर करून सत्ता काबीज केली. तेव्हापासून देशाची दिशा भरकटली आहे. सोनम वांगचूक यांना अटक करणे, शेतकरी आंदोलन, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचे आंदोलन, सरन्यायाधीशांवर बूट फेकणे अशा घटनांनंतर ही समाज उदासीन आहे.
शिवराज मोरे म्हणाले कि, मतचोरी करून भाजप सत्तेत आला आहे. मतदानानंतर निकाल पुढे ढकलणे आणि नंतर ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळवणे ही पद्धत लोकशाहीस घातक आहे. या सरकारला रोखण्यासाठी जन आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे.
आर्थिक भ्रष्टाचारासोबत मतचोरी ही भाजपची मोठी चाल आहे. अशी टीका संजय मोरे यांनी केली. मतचोरीचे वास्तव्य लोकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मतदार याद्यांमधील घोळ तातडीने दूर करणे गरजेचे आहे. असे जगताप यांनी सांगितले. अविनाश बागवे यांनी प्रास्ताविक केले. प्रथमेश आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील मलके यांनी आभार मानले.
काँग्रेसच्या काळात कल्याणकारी उपक्रम
सन 2004 ते 2014 या दहा वर्षात काँग्रेस सरकारने अन्नसुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू – अधिग्रहण कायद्यात सुधारणा तसेच जागतिक स्तरावर गाजलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसह अनेक लोक कल्याणकारी उपक्रम राबवले असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.



