पत्रकारिता ही सामाजिक जबाबदारी असून तो जनतेचा आवाज आहे – उत्तम कांबळे

नाशिक प्रतिनिधी
पत्रकारिता ही सामाजिक जबाबदारी असून तो जनतेचा आवाज आहे. मूल्याधिष्ठित पत्रकारिता ही समाजाची ताकद आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार उत्तम कांबळे यांनी काढले. रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार आणि पत्रकार सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

गंजमाळ येथील रोटरी कम्युनिटी हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.संतोष साबळे, सचिव मकरंद चिंधडे, तसेच जनसंपर्क संचालक ॲड. विद्युल्लता तातेड, मोना सामनेरकर यांची उपस्थिती होती.

श्री. उत्तम कांबळे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ संपादक अभय सुपेकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सुपेकर म्हणाले की, पुलंचा नारायण जशी सर्व कामे करतो, परंतु त्याची नोंद मात्र कोणी घेत नाही. अशीच काहीशी परिस्थिती पत्रकारांची असते. आता या परिस्थितीत बदल झालेला असून रोटरी क्लबने पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला आहे, हे महत्त्वाचे आहे. पत्रकारितेमध्ये कितीही बदल झालेले असले तरी, पत्रकारितेची मूल्य व तत्व आजही कायम आहेत. आणि यापुढेही ती कायम टिकून राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात ‘सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार अरुण मलानी, ‘ॲग्रोवन’चे बातमीदार मुकुंद पिंगळे, दैनिक भास्करचे सोमनाथ कोठुळे, छायाचित्रकार अमित शिंदे, भ्रमरचे हितेश शहा, पुढारीचे आसिफ सय्यद, लोकमत टाइम्सचे आकाश खांडके, समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र टाइम्सच्या गायत्री जेऊघाले, देशदूतचे भरत पगारे, महादर्पण डिजिटल पोर्टलचे संपादक सुनील गीते, गावकरीचे मुकुंद बाविस्कर, दिशा न्युजचे मनोहर गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.

प्रारंभी विक्रम बालाजीवाले आणि मोना सामनेरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. गौरव सामनेरकर आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष साबळे यांनी यांनी प्रास्ताविक केले. मकरंद चिंधडे यांनी मानपत्राचे वाचन केले. रोटरी क्लबला ९१ हजार रुपयांची देणगी देणारे प्रथितयश ज्येष्ठ शास्त्रज्ञ अविनाश शिरोडे यांचा तसेच पत्रकारांचा उत्तम कांबळे आणि अभय सुपेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. विद्युल्लता तातेड आणि प्रणाली देशपांडे यांनी केले. मकरंद चिंधडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



