इतर

…..अन्यथा भंडारदरा धरण  शताब्दी कार्यक्रम उधळून लावू : किसान सभा

अकोले प्रतिनिधी 

भंडारदरा धरणाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भंडारदरा धरण शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र जसे धरण बांधण्याला 100 वर्षे झाली आहेत तसेच धरणातून जे विस्थापित झाले त्यांच्या विस्थापनालाही 100 वर्षे पूर्ण होत आहेत. धरणातून विस्थापित झालेल्या आदिवासींना अद्यापही पिण्यासाठी व सिंचनासाठी भंडारदरा धरणातून पाणी देण्यात आलेले नाही. धरणात बुडालेल्या जमिनीच्या बदल्यात मोबदला म्हणून दिलेल्या जमिनीही आदिवासींच्या पूर्ण नावावर करण्यात आलेल्या नाहीत. वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून आदिवासींना अद्यापही जमिनीचे मालक करण्यात आलेले नाही. 

किसान सभेने यावर सातत्याने आंदोलन करत आवाज उठवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राजुर लोणी लॉंग मार्चमध्ये सुद्धा याबाबत मागणी उचलण्यात आली. यानुसार शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबत सर्वेक्षण करण्याची घोषणाही जलसंपदा मंत्र्यांनी केली. तसे आदेशही काढले. जमीन नावे करण्याबाबतही मागणी मान्य करण्यात आली. मात्र याबाबतची पुढील कारवाई अद्यापही सुरू झालेली नाही. किसान सभेने या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संघर्षाची हाक दिली असून याबाबत जागृती मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत दिनांक 7 एप्रिल रोजी हजारो शेतकरी शेंडी, घाटघर, मुरशेत, भंडारदरा या भंडारदरा धरणांच्या मागील गावांमधून  वेहिकल मार्च करणार आहे. लाँग मार्चला दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कारवाई न झाल्यास भंडारदरा धरण शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे. यासंदर्भातले निवेदन अकोले तहसीलदार यांना देण्यात आले असून जलसंपदा विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयालाही याबाबत अवगत करण्यात आले आहे.

भंडारदरा धरणाच्या मागील सर्व गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी निळवंडे उच्चस्तरीय कालव्याच्या धर्तीवर गुरुत्वाकर्षण पद्धतीने द्यावे यासाठी तीन प्रस्ताव किसान सभेच्या वतीने सादर करण्यात आले आहेत. राजुर लोणी लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रालयस्तरीय बैठकीत या प्रस्तावांची व्यावहारिकता व तांत्रिक बाबी तपासून सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. मात्र संबंधित विभाग या आदेशाची अंमलबजावणी करण्यात  चाल  ढकल करत आहे. जलसंपदा विभागाच्या शेंडी येथील संबंधित कार्यालयावर दिनांक 7 एप्रिल रोजी जोरदार निदर्शने करून परिसरात वेहिकल मार्च सुरू करण्याचा निर्णय या पार्श्वभूमीवर किसान सभेने घेतला आहे.

असे  डॉ अजित नवले  सदाशिव साबळे  नामदेव भांगरे 

ताराचंद विघे  एकनाथ मेंगाळ  तुळशीराम कातोरे राजाराम गंभीरे  यांनी सांगितले 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button