निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी

मुंबई प्रतिनिधी /श्रीनाथ लाड
राज्यातील महिलांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी आणि महिला आयोगाला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या धाडसी कार्यशैलीमुळे ‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी श्रीमती मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बोरवणकर या १९८१ च्या बॅचच्या अधिकारी असून महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला.महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राजकीय व्यक्तीऐवजी एका सक्षम आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, अशी मागणी राजकीय स्तरावरून, विशेषतः आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली होती.
मुंबई गुन्हे शाखेचे नेतृत्व, पुण्याच्या पोलीस आयुक्त आणि तुरुंग महानिरीक्षक यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. जळगाव सेक्स स्कँडलचा पर्दाफाश आणि अंडरवर्ल्ड विरोधातील त्यांची कारवाई विशेष गाजली होती.
रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते. राज्यात महिलांविरुद्ध वाढणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, बोरवणकर यांच्यासारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि सक्षमीकरण या प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, यामुळे महिला आयोगाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि तत्परता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



