होमगार्ड कायद्यात तत्काळ दुरुस्तीकरून ३६५ दिवस काम द्या!

मुंबई : होमगार्ड (गृहरक्षक) कायद्यात तत्काळ दुरुस्ती करावी व होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी ३६५ दिवस काम द्यावे, या मागणीकरिता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. राज्यात सध्या सुमारे ४४ हजार होमगार्ड आहेत. तसेच ११ हजार रिक्त जागा असून सण, उत्सव काळात होमगार्ड यांना काम असते. दिवसाला १२८३ रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो. परंतु; हा भत्ता सहा- सहा महिने मिळत नाही. त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी ३६५ दिवस काम द्या, सेवानिवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी ५० लाखांची आर्थिक मदत द्या, पोलीस भरतीमध्ये वयात ३८ वर्षापर्यंत सवलत द्या व भरतीमध्ये १५ टक्के कोटा ठेवा, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची मागणी करत असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असेही डॉ. रामलिंग पुराने यांनी सांगितले. होमगार्डस यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन श्री किशोर नेवासकर,श्री लक्ष्मण गीते, दादासाहेब गिते, प्रकाश साळवे यांनी केले आहे


