पनवेलच्या गुन्हेगारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज..

नवीन डीसीपी रश्मी नांदेडकर यांचेसमोर पनवेल च्या गुन्हेगारीचे आव्हान
पनवेल प्रतिनिधी| /श्रीनाथ दत्तात्रेय लाड:
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ-३ च्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) पदाचा कार्यभार रश्मी नांदेडकर यांनी नुकताच स्वीकारला. महिला पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची वर्णी लागल्याने कायदा-सुव्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा असतानाच, त्यांनी पदभार स्वीकारताच पनवेल शहरात खुनाचे सत्र सुरू झाले आहे. या ताज्या हत्येच्या घटनेने जणू डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे पनवेलमध्ये ‘रक्ताळलेले स्वागत’ झाले असून,
परिमंडळ-३ परिसरात विविध ठिकाणी गुन्हेगार आणि त्यांच्या बगलबच्चांनी मोठा हैदोस घातला आहे. अवैध धंदे करणाऱ्या टोळ्या आणि स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचे मोठे आव्हान नवनियुक्त डीसीपी नांदेडकर यांच्यासमोर उभे ठाकले आहे. या ताज्या हत्येचा उलगडा करणे आणि फरार आरोपींचा शोध घेणे हे त्यांच्यासमोरील पहिले मोठे आव्हान आहे. आता डीसीपी नांदेडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कशा प्रकारे सूचना देतात आणि फरार आरोपींना तात्काळ गजाआड कसे करतात, याकडे सर्व पनवेलकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
पनवेल शहर हे भौगोलिक आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील बनत चालले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता जुनाट पद्धती सोडून संवेदनशील भागात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवणे, गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर अचानक धाडी टाकून कोम्बिंग ऑपरेशन राबवणे,हद्दपार (तडीपार) केलेल्या गुन्हेगारांवर कडक पाळत ठेवणे, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दामिनी पथक अधिक सक्रिय करणे अशा प्रकारचे उपाययोजना तातडीने राबवणे काळाची गरज बनली आहे.
पनवेल शहरातील ही चौथी हत्या असल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि संताप आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या गुन्हेगारीकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदासाठी कोणत्याही राजकीय शिफारसीचा विचार न करता, तसेच नवी मुंबईत यापूर्वी काम न केलेला निष्कलंक अधिकारी द्यावा, अशी मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून पनवेलला एक कडक शिस्तीचा, ‘दबंग’ पोलीस अधिकारी द्यावा, जेणेकरून पनवेल शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील.



