इतर

महावितरण कोतूळ उपकेंद्राचा कारभार रामभरोसे, ग्राहकां मध्ये संताप!

सहाय्यक अभियंता पद रिक्त; ब्राह्मणवाडा येथील अभियंत्यांकडे अतिरिक्त कार्यभार, 

 

कोतुळ प्रतिनिधी 

महावितरणच्या ३३/११ केव्ही कोतूळ उपकेंद्राचा कारभार रामभरोसे चालला असून, येथील ‘सहाय्यक अभियंता’ हे महत्त्वाचे पद रिक्त असल्याने ग्राहकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

सध्या या उपकेंद्राचा अतिरिक्त कार्यभार ब्राह्मणवाडा येथील कक्ष अभियंत्यांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, ते आठवड्यातून केवळ एकच दिवस कोतूळ उपकेंद्रात येत असल्याने नागरिकांची आणि शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. या अनागोंदी कारभाराविरोधात  येथील नागरिकांनी  तीव्र संताप व्यक्त करत थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सध्या येथे कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे उपकेंद्रांतर्गत वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ग्राहकांचे मीटर रीडिंग योग्य पद्धतीने घेतले जात नसल्यामुळे वीज बिलांमध्ये मोठ्या चुका होत आहेत. या बिल दुरुस्तीसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातच येथील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या कक्ष कार्यालयांतर्गत ‘कोहने सबस्टेशन’ देखील येत असल्यामुळे या कार्यालयावर आधीच कामाचा अतिरिक्त ताण आहे.

कोतूळ उपकेंद्र हे १५ एमव्हीए क्षमतेचे असून यावर ६ हजार १४० घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहक, ४० पाणीपुरवठा योजना आणि २ हजार ४०० शेती पंपांचे ग्राहक अवलंबून आहेत. सध्या येथे ११ केव्हीचे ७ फीडर (५ कृषी व २ गावठाण) कार्यरत असून, आणखी २ कृषी व ३ गावठाण फीडरचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच ३३ केव्ही आउटगोइंगचे १ फीडर सुरू आहे. एवढा अवाढव्य कारभार आणि दोन सबस्टेशनचा ताण असताना केवळ एका दिवसाच्या उपस्थितीत ग्राहकांच्या समस्या सोडवणे अशक्य बनले आहे.

“एवढ्या मोठ्या उपकेंद्राला कायमस्वरूपी अधिकारी नसणे ही महावितरणची मोठी उदासीनता आहे. अतिरिक्त कार्यभार असलेल्या अधिकाऱ्यांवर कोहने सबस्टेशनचाही ताण आहे. ते आठवड्यातून एकदाच येत असल्यामुळे आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अयोग्य मीटर रीडिंग आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने हे रिक्त पद तातडीने भरले नाही आणि कारभारात सुधारणा केली नाही, तर  तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा  ग्रामस्थांनी दिला आहे  

=========

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button