सावता महाराजांचे विचार आचरणात आणा – आकाश महाराज फुले,

नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथीचा सप्ताह उत्साहात संपन्न;
अहिल्यानगर प्रतिनिधी
नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी. . . अहिल्यानगर: प्रतिनिधी- नगर तालुक्यातील नेप्ती येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथीनिमित्त तीन दिवस भक्तीचा महापूर आला होता. श्री संत सावता महाराज तरुण मंडळ, माळी समाज व नेप्ती ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मंगळवारी काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
रविवार 9 ऑगस्ट ते मंगळवार 11 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या धार्मिक सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हजेरी लावली. सप्ताहाचे उद्घाटन ह.भ.प. शिवचरित्रकार आकाश महाराज फुले यांच्या हस्ते वीणा पूजनाने झाले. तीन दिवस दररोज सायंकाळी हरिपाठानंतर रसभरीत किर्तनाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
पहिल्या दिवशी ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था, नेप्तीच्या अनुष्का दिदी जाधव यांनी तर दुसऱ्या दिवशी ह.भ.प. श्री शंकर महाराज लोखंडे, कोल्हार खुर्द यांनी किर्तन केले. सांगता दिनी सकाळी ह.भ.प. शिवचरित्रकार आकाश महाराज फुले यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपूर्ण गाव भक्तिमय झाले.
सावता महाराज म्हणजे केवळ संत नव्हते, ते शेतकऱ्यांचे दैवत होते. एका हातात नांगर आणि दुसऱ्या हातात टाळ घेऊन त्यांनी जगाला ‘कर्म हेच पूजन’ हा संदेश दिला. शेती करूनही त्यांची भक्ती कधी कमी झाली नाही. आजच्या काळात आपण शेतीला दुय्यम समजतो, पण सावता महाराजांनी शेतातूनच परमेश्वर गाठला.
हा थोर संत आजही आपल्याला शिकवतो की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकत्र निभावता येतात. आपली माती, आपली शेती आणि आपली संस्कृती जपली पाहिजे. तरुणांनी मोबाईल बाजूला ठेवून थोडा वेळ तुकोबांचा अभंग आणि सावता महाराजांचे चरित्र वाचले पाहिजे. तरच आपले गाव, आपला समाज प्रगती करेल. त्यामुळे सावता महाराजांचे विचार आचरणात आणा असे प्रतिपादन शिवचरित्रकार आकाश महाराज फुले यांनी केले..

आकाश महाराजांच्या ओजस्वी वाणीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होतेकीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था व नेप्ती भजनी मंडळ यांनी तीनही दिवस उत्तम साथसंगत दिली.हा सप्ताह शांततेत आणि भक्तिभावात पार पाडण्यासाठी सावता महाराज तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. या सोहळ्यामुळे नेप्ती गाव पुन्हा एकदा वारकरी संस्कृतीने न्हाऊन निघाले



