संगमनेर साहित्यिक मंडळाचा अनोखा रक्षाबंधन सोहळा उत्साहात

संगमनेर प्रतिनिधी
रक्षाबंधन म्हणजे केवळ बहीण-भावाच्या प्रेमाचे नाते नव्हे, तर प्रेम, स्नेह, विश्वास आणि आपुलकीच्या बंधनाचा उत्सव आहे. याच भावनेला साहित्यिक नात्याची सुंदर जोड देत संगमनेर साहित्यिक मंडळाच्या सभासदांनी रक्षाबंधनाचा आगळावेगळा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
संगमनेर साहित्यिक मंडळाचे मार्गदर्शक सदस्य मा. रमेश काका सराफ यांनी मंडळाच्या सभासदांनी एकत्र येऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम घ्यावा, अशी सूचना केली होती. या संकल्पनेला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानुसार शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी मा. पुष्पाताई निऱ्हाळी यांच्या उपस्थितीत हा सुंदर सोहळा संपन्न झाला.
यावेळी सभासदांनी एकमेकांना राखी बांधून साहित्याच्या नात्याचे, परस्पर स्नेहाचे आणि एकतेचे बंध अधिक दृढ करण्याचा संकल्प केला.
या प्रसंगी डॉ. पेटकर, ज्ञानेश्वर गोंटे, महेश गोडसे, ज्ञानेश्वर राक्षे, बाळकृष्ण महाजन, मुकुंद डांगे, सुरेश परदेशी, डॉ. जी. पी. शेख, लक्ष्मण ढोले, राजेंद्र वेल्हाळ, रमेश काका सराफ, गिरीश सोमाणी यांच्यासह संगमनेर साहित्यिक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“उद्या एकमेकांच्या मनगटावर बांधली जाणारी राखी ही केवळ रेशमी धाग्याची नसेल; ती असेल साहित्यिक बंधाची, परस्पर स्नेहाची आणि एकतेची!” या भावनेने कार्यक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला.
“साहित्य जोडतं… जगवतं… घडवतं…” या विचाराला साकारत सभासदांनी एकमेकांशी असलेले साहित्यिक ऋणानुबंध अधिक घट्ट केले. शब्दांनी जोडलेली माणसे जेव्हा एका धाग्यात बांधली जातात, तेव्हा तो धागा केवळ मनगटावर राहत नाही, तर मनामनांत घट्ट विणला जातो, याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प प्रमुख रमेश काका सराफ, सचिव ज्ञानेश्वर राक्षे आणि अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
“साहित्याचा धागा… सदैव जपू या!” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.



