जिल्हा बँक वाचविण्यासाठी नाही साखर कारखान्यांची थकबाकीसाठी बिनविरोध चा आटापिटा – काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे

शेवगाव /प्रतिनिधी
एकमेकांचे तोंडही पाहण्याची इच्छा नसणारे व परस्परांवर जहरी टीका करणारे जिल्ह्यातील प्रस्थापित साखरसम्राट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. हे ऐक्य बँक वाचविण्यासाठी आहे की साखर
कारखान्यांची थकबाकी अबाधित ठेवण्यासाठी, असा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी केला. कारखाने वाचविण्यासाठीच प्रस्थापित नेते व साखरसम्राटांची पळापळ सुरू झाली असल्याचेही त्यांनी म्हटले.
बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर
सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण
सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे होते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. मात्र, केदारेश्वर कारखान्याला बँकेने कर्जपुरवठा केला नाही, तर जिल्ह्यातील प्रस्थापित १२ साखर कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज व थकबाकी आहे, असा दावा ढाकणे यांनी केला. या थकबाकीची वेळेत वसुली झाली, तर बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांची बँक टिकविण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यंदा दुष्काळजन्य परिस्थितीमुळे साखर कारखानदारीसमोर मोठे आव्हान आहे. साखरेचे दर आणि उत्पादनखर्च यांचा मेळ बसत नसल्याने कारखानदारी अडचणीत असून, या प्रश्नावर शासनाने नियंत्रणाची भूमिका घेण्याची गरज आहे. पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठीही आपण पुढाकार घेणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी दुष्काळी परिस्थिती आणि
खासगी उसाच्या गुऱ्हाळांमुळे कारखान्याला ऊसपुरवठा कमी
होण्याची शक्यता व्यक्त केली. कार्यकारी संचालक किरण
शेलार यांनी अहवाल वाचन केले. आयुब शेख व बापूराव
घोडके यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले, तर आभार डॉ. प्रकाश घनवट यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष माधवराव काटे, संचालक सुरेशचंद्र होळकर, डॉ. प्रकाश घनवट, रणजित घुगे, अशोकराव तानवडे, शहादेव पातकळ, सदाशिव दराडे, शिवाजी जाधव, त्रिंबक चेमटे, सुभाष खंडागळे, भाऊसाहेब पोटभरे यांच्यासह सभासद,शेतकरी व कामगार उपस्थित होते.
====



