इतर

पत्रकारांना विधान परिषदेवर संधी द्या;- ॲड. गोपाळ शेळके

Published On: November 19, 2026

सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने राष्ट्र्रीय पत्रकार दिन साजरा ; आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

अलिबाग प्रतिनिधी

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. मात्र, काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप बदलले असून आज अनेक पत्रकार समाजातील प्रश्न मांडण्याबरोबरच समाजसेवकाची भूमिकाही बजावत आहेत. पत्रकारितेचे हे सेवाव्रत टिकवण्यासाठी राज्य सरकारने पत्रकारांना दरमहा एक लाख रुपये पेन्शन द्यावी, तसेच विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. तरच लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत होईल, असे आवाहन कर्जतचे विधिज्ञ ॲड. गोपाळ शेळके यांनी केले. पत्रकारांनी आपल्या मागण्यांसाठी संघटितपणे लढा उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशनच्या (एसजेए) वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सोमवारी (दि. १६) सांबरी, अलिबाग येथील वात्सल्य वृद्धाश्रमाच्या सभागृहात पत्रकारांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एसजेएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष व विश्वस्त मिलिंद वैद्य, संस्थापक विश्वस्त व राष्ट्रीय सरचिटणीस संजयकुमार जोशी, निर्मिती व विकास संचालक शिरीष शिवणगीकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, कायदेशीर सल्लागार ॲड. ओंकार माने, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष यादवराव पावसे, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, प्रदीप पाटील, अरविंद म्हात्रे आदी उपस्थित होते. पत्रकारितेचे सेवाव्रत आजही अनेक पत्रकार निष्ठेने निभावत आहेत.

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांनी पार पाडलेली भूमिका आज पत्रकार बजावताना दिसतात. त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे, असे ॲड. शेळके यांनी सांगितले.

मेळाव्यात एसजेएचे शिक्षण विभाग संचालक व पिंपरी-चिंचवड येथील ओझर्डे रॅडिकल इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. भूषण ओझर्डे, कृषी व उद्योग विभागाचे संचालक संतोष पाटील, पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज या शैक्षणिक स्टार्टअपचे कार्यकारी संचालक निलेश छेडवलकर, फीलगुड स्टार्टअपचे गजानन दळवी आणि प्रभाकर चेडे यांनी डिजिटल सादरीकरणाद्वारे पत्रकारांसाठी उपलब्ध आर्थिक उत्पन्नाच्या संधींची माहिती दिली. या संधींचा लाभ घेण्याची तयारी अनेक पत्रकारांनी दर्शविली. तसेच पत्रकार आणि स्थानिक नागरिकांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाने शिबिरासाठी परिश्रम घेतले.

प्रास्ताविकात एसजेएचे संस्थापक विश्वस्त व राष्ट्रीय सरचिटणीस संजयकुमार जोशी यांनी पत्रकारांना आपल्या हक्कांविषयी जागरूक होण्याचे आवाहन केले. एसजेए ही केवळ संघटना नसून विश्वस्त संस्था आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांना उत्पन्नाच्या माध्यमातून सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने अल्पावधीत महाराष्ट्रात एक हजार सभासद नोंदणीचा टप्पा गाठला असून गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि जम्मू-काश्मीर येथेही सभासद नोंदणी सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड या तीन तालुक्यांसाठी अध्यक्ष म्हणून असिफ शेख, तर पिंपरी-चिंचवड शाखेच्या सरचिटणीसपदी संदीप पवार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

एसजेएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व विश्वस्त मिलिंद वैद्य यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन, अधिस्वीकृती पत्र, हक्काचे घर, आरोग्यविषयक सवलती आणि दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक व कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड येथे राज्यातील पहिला पायलट शैक्षणिक प्रकल्प लवकरच सुरू होणार असून, टप्प्याटप्प्याने राज्यातील अन्य ठिकाणीही अशी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या केंद्रांमध्ये पत्रकारिता, संगणक प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्यक, ऑफिस असिस्टंट आणि परदेशी भाषा अशा नऊ प्रकारचे अल्पकालीन अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ पत्रकारांच्या मुलांसह आर्थिक दुर्बल घटक, शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांनाही मिळणार आहे. निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र किंवा राज्य स्तरावर पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ अथवा कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्याची मागणीही संस्थेने सरकारकडे केली आहे.

अध्यक्षीय समारोपात डॉ. जयपाल पाटील यांनी पत्रकारांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी विधानपरिषदेवर पत्रकारांचा प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी संस्था दहा लाख रुपयांपर्यंत मदत करीत असून, पेन्शन, अधिस्वीकृती पत्र, पंतप्रधान आवास योजनेतून घरे आणि पाल्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण अशा विविध विषयांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचा विस्तार विविध राज्यांत होत असून, या उपक्रमांना सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी संघटित पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संतोष पाटील, बळवंत वालेकर, प्रदीप पाटील, अरविंद म्हात्रे, रमेश शिंगे आणि रामचंद्र पिल्दे यांनीही मनोगत व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र सेक्रेटरी सुनील गिते यांनी शेवटी आभार मानले मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button