इतर

तुळशी विवाहानिमित्त मवेशीत १०० तुळशींची लागवड;

अकोले प्रतिनिधी 

 : तुळशी विवाहाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमी राहुल राऊत यांच्या पुढाकारातून मवेशी येथील ऑक्सिजन उद्यानात १०० तुळशींची लागवड करण्यात आली. धार्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत निसर्गाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

तुळस ही भारतीय संस्कृतीतील पूजनीय वनस्पती असून आयुर्वेदातही तिचे विशेष महत्त्व आहे. आज वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि पाणीटंचाई लक्षात घेता वृक्षलागवडीसोबतच औषधी वनस्पतींचे संगोपन करण्याची गरज आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या वृक्षांच्या सभोवताली तुळशीची रोपे लावण्यात आली आहेत. एका झाडाला पाणी देताना सभोवतालच्या तुळशींनाही ओलावा मिळणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून वृक्ष आणि तुळशींचे एकत्रित संगोपन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मवेशी परिसरात वृक्षलागवड, जलसंधारण, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था, बीज संकलन आणि पर्यावरण जनजागृती अशा विविध उपक्रमांतून पर्यावरणप्रेमी राहुल राऊत सातत्याने निसर्ग संवर्धनाचे काम करत आहेत. याच कार्याचा एक भाग म्हणून तुळशी लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला.

“आजच्या काळात झाडे लावणे महत्त्वाचे आहेच; पण ती जगवणे अधिक महत्त्वाचे आहे. एका झाडाला दिलेल्या पाण्यात सभोवतालच्या तुळशीही जगल्या पाहिजेत. कमी पाण्यात अधिक हिरवाई निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे राहुल राऊत यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी विक्रम मालुंजकर यांनी तुळशीची रोपे उपलब्ध करून दिली. या वेळी विद्यमान सरपंच यमाजी भांगरे, संजय भांगरे, महामुनी सर, काळे सर, मोरे सर, कोहिनूर भाऊ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

======

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button