जेष्ठ पत्रकारांना प्रत्येकी एक लाख पेन्शन द्या ‘सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन’ची पंतप्रधान मोदींकडे मागणी

राष्ट्रीय पेन्शन पंचायतीपुढेही प्रश्न मांडला
पुणे, ता. 23 नोव्हेंबर : नवी दिल्लीत लवकरच होणाऱ्या ‘राष्ट्रीय पेन्शन पंचायती’च्या अनुषंगाने भारतातील सर्व संघटित, असंघटित सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांना सरसकट प्रत्येकी एक लाख रुपये पेन्शन देण्यात यावी, तसेच वरिष्ठ – जेष्ठ, वृद्ध पत्रकार व पत्रकारेतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक, आरोग्य विषयक व सामाजिक प्रश्न सोडवून त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्रीय अथवा राज्य स्तरावर वैधानिक पत्रकार कल्याण विकास महामंडळ स्थापन केले जावे, अशी मागणी ‘सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन ‘ (एसजेए) ने पंतप्रधान नरेन्द्र मोदी तसेच राष्ट्रीय पेन्शन पंचायत, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
‘सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन’ ही राज्यातील धर्मादाय विश्वस्त नोंदणीकृत संस्था आहे. 2023 पासून महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यात या संस्थेचे कार्य सुरू आहे. केवळ ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी यांच्यासाठी, निवृत्त झालेल्या तसेच इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल ऑनलाइन मीडिया यांच्यासाठी ही विश्वस्त संस्था कार्यरत आहे. त्यांच्या आर्थिक कोलमडलेल्या विषयावर या असोसिएशनच्या माध्यमातून अनेक स्टार्टअप बरोबर कार्य सुरू आहे. त्या माध्यमातूनही या पत्रकारांना आर्थिक सबलता देण्याचे प्रयत्न ‘एसजे ए’ करीत आहे. परंतु, आजच्या काळातील महागाईमुळे या पत्रकारांचे जीवन असह्य झाले आहे. त्यांचा मान सन्मानही हरपला आहे. तो पुनश्च: फक्त आणि फक्त आर्थिक तरतूद केली तरच वर्तमान काळात त्यांचे जीवन सुसह्य होईल, असे नियोजन ‘एसजेए’ या विश्वस्त संस्थेने केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना अधिस्वीकृती पत्रिका, सन्मान मानधन आणि इतर सार्वजनिक सुविधा मिळवून देण्यासाठी पीएमओ कार्यालय, श्रम मंत्रालय तसेच केंद्रीय मंत्रालयाचे सचिव, राष्ट्रीय पेन्शन पंचायत सचिव,नवी दिल्ली, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव, महासंचालक माहिती आणि जनसंपर्क, मुंबई यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या 75 वर्षांपासून देशातील असंघटीत पत्रकार, पत्रकारेतर कर्मचारी, ग्रामीण पत्रकार उपेक्षित आहेत. वास्तविक, पत्रकार माध्यम हा भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. त्याची वास्तव सत्यता मात्र, अत्यंत निराशाजनक आहे. जगात आज भारत तिसरी महासत्ता म्हणून उदयास येत असताना भारतीय लोकशाहीच्या परंपरेला अनुसरून चौथ्या महासत्तेच्या या स्तंभाला जीर्ण करणे केंद्र सरकारला शोभत नाही. त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यावर खूप मोठे संकट आले आहे. आरोग्याचा आणि सार्वजनिक सेवांच्या बाबतीत त्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांची ही परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक सरकारे आली आणि गेली परंतु, पत्रकारांचा प्रश्न जसा आहे तसाच राहिलेला आहे. हे आपल्या देशाच्या वैभवशाली इतिहासाला शोभणारे नाही. सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशनच्या नुकत्याच सांबरी, अलिबाग येथे झालेल्या महा मेळाव्यातही
1)सेवानिवृत्त व ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारेतर कर्मचारी यांना सरकारने प्रत्येकी एक लाख रुपये पेन्शन द्यावे,
2) सर्व पत्रकारांना अधिस्विकृती पत्र विनाअट देण्यात यावे.
3) पत्रकारांचे सामाजिक, आर्थिक, आरोग्य विषयक प्रश्न कायमचे सोडविण्यासाठी कायमस्वरूपी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावे.
4) राष्ट्रीय स्तरावर महिला, पुरुष, ग्रामीण पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी यांची संख्या निश्चित केली जावी. असे ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान, एकीकडे मेळाव्यात ठराव संमत होत असताना नवी दिल्लीत लवकरच राष्ट्रीय पेन्शन पंचायत होत आहे. त्या अनुषंगाने ‘एसजेए’ ने पेन्शन पंचायतीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधिताना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर ‘एसजेए’चे विश्वस्त व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील, विश्वस्त व राष्ट्रीय उपाध्यक्ष मिलिंद वैद्य तसेच संस्थापक विश्वस्त आणि राष्ट्रीय सरचिटणीस संजयकुमार जोशी तसेच संस्थापक विश्वस्त आणि माजी अध्यक्ष डॉ. राम अग्रवाल यांच्या सह्या आहेत.


