इतर

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी, आमदार काशिनाथ दातेंची अजित पवार पवारांकडे मागणी

दत्ता ठुबे /पारनेर ता.२९

. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते ( सर ) यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पारनेर व कान्हुर पठार मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान होऊनही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांमुळे भेटत नसलेल्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करत सबंधित मंडळातील शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.

नामदार अजित पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पारनेर तहसिल अंतर्गत तालुक्यात एकूण १२ महसूल मंडळे आहेत. यापैकी १० महसूल मंडळे अतिवृष्टी निकषात बसून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत आहे. तथापि, पारनेर व कान्हुर पठार महसूल मंडळे तांत्रिक कारणास्तव एका दिवशी ६५ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद नसल्याने निकषात समाविष्ट झालेली नाहीत. परंतु तालुक्याचा एकूण सरासरी पर्जन्यमान २१३ टक्क्यांपेक्षा अधिक असून, या दोन्ही मंडळांमध्येही शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सबंधित गावांतील नुकसानीची महसूल व कृषी विभागाकडून पाहणी व पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. तसेच मा.जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी मा.पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारशीने या दोन्ही महसूल मंडळांचा विचार करण्याचा प्रस्तावही शासनाकडे सादर केलेला आहे. सबंधित नुकसानीचा लाभ मिळत नसल्याने या दोनही मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून त्यांना नुकसान भरपाई मिळणे अत्यावश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सबंधित शेतकऱ्यांच्या नाराजीचा व वास्तव परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पारनेर व कान्हुर पठार महसुल मंडळातील शेतकऱ्यांना तालुक्यातील इतर मंडळातील शेतकऱ्यांप्रमाणेच विशेष बाब म्हणून मंजुरी देऊन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार सह मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांचेकडे करण्यात आली असून नामदार अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सबंधित विषयी आढावा घेवून उचित निर्णय घेणार असल्याबाबत यावेळी स्पष्ट केले.

आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button