सामाजिक

कोतुळ येथे ओम साईराम मित्र मंडळाचा सामाजिक देखावा ठरला लक्षवेधी!

कोतुळ प्रतिनिधी
———————– ——- ——
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोतुळात गणरायाचे उत्साहात आगमन झाले असून कोतुळ मधील ओम साईराम मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी मुलगा माझा साहेब झाला हा सामाजिक प्रश्नावरील जिवंत देखावा सादर करण्यात आला असून या देखाव्याचे उद्घाटन कोतूळ मधील आजी-माजी सैनिकांच्या हस्ते करून मंडळाने एक आदर्श घालून दिला आहे.

यामध्ये रामदास सर्जेराव देशमुख, सचिन मनोहर घोलप, दत्तात्रय भिकाजी गोंदके, रमेश बाळासाहेब देशमुख व सिद्धेश दिपक बोऱ्हाडे या आजी-माजी सैनिकांचा यामध्ये सन्मान करण्यात आला.


पंधरा-वीस वर्षांपूर्वी कोतुळमध्ये जिवंत देखाव्याची फार मोठी परंपरा होती, यामध्ये श्रीकृष्ण तरुण मंडळ, समता तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, खटपट नाका तरुण मंडळ, आण्णाभाऊ साठे व नामदेव महाराज मित्र मंडळ या मंडळांमध्ये देखाव्यासाठी चढा ओढ सुरू असायची, त्यामुळे परिसरातील नागरिकांना पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक प्रश्नावर देखावे पाहायला मिळत. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक आपल्या बैलगाड्या जोडून या देखाव्यासाठी रात्री गावात हजेरी लावीत असत, त्यातून सामाजिक एकोपा जपला जायचा.


पुढे टेलिव्हिजनच्या जमान्यात ही कला काळाच्या पडद्याआड गेली.जवळजवळ दोन तपानंतर कोतुळ मधील ओम साईराम मित्र मंडळाच्या वतीने ही परंपरा पुन्हा सुरू केली असून मुलगा माझा साहेब झाला या आजच्या नव्या आणि जुन्या पिढीतील हा संघर्ष यात आपल्याला पाहायला मिळतो. यातून शिक्षणाबरोबरच संस्कारही महत्त्वाचे आहेत. असा संदेश या देखाव्यातून समाजामध्ये जात आहे आणि त्याची खरोखरच तरुण पिढीला आज गरज आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातून नागरिकांची गर्दी होत असून ओम साईराम मित्र मंडळाचा हा उपक्रम तालुक्यामध्ये कौतुकाचा विषय झाला आहे.
या सामाजिक प्रश्नावरील जिवंत देखाव्यामध्ये सुरज जगदाळे, अस्मिता कोते, भूषण शेळके, स्वामी बोऱ्हाडे, प्रशांत बोऱ्हाडे, प्रफुल्ल देशमुख, दामिनी जगदाळे, समृद्धी कोते, अमोल कोते या कलाकारांशिवाय रोहन कोते व कृष्णा शेळके या बालकलाकारांनी ही अतिशय उत्कृष्ट आपल्या भूमिका सादर केल्या आहेत.
उत्कृष्ट दिग्दर्शन, रंगमंच सजावट, साऊंड इफेक्ट, लाईट डेकोरेशन , सुंदर नेपथ्य व कलाकारांच्या अभिनयाने मुलगा माझा साहेब झाला हा जिवंत देखावा निश्चितच नागरिकांच्या कौतुकास पात्र झाला आहे.


नवरात्र उत्सवातही या मंडळाचा खेळ पैठणीचा हा अत्यंत देखणा कार्यक्रम होत असतो त्यात लहान मुली पासून ऐंशी वर्षांच्या आजी पर्यंत महिला भाग घेऊन आपला आनंद द्विगुणीत करतात. कोतुळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुरेशराव कोते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची अतिशय चांगली घोडदौड चालू आहे. हा जिवंत देखावा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

देखव्याचे काही क्षण चित्र येथे पहा

👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button