एस.बी.आय ‘युथ फॉर इंडिया’ ने शेणित शाळेसाठी उभारला सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा प्रकल्प

महादर्पण प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम शेणीत येथील राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय, ठोकळवाडी जि.प. प्राथमिक शाळा ठोकळवाडी येथे बायफ–बी.आय.एस.एल.डी, पुणे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आणि एस.बी.आय ‘युथ फॉर इंडिया’ फेलोशिप नागोलू तारकराम रेड्डी यांच्या आर्थिक सहकार्याने उभारण्यात आलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन नेहा बोरकाटकी (उपव्यवस्थापक, एसबीआय ‘युथ फॉर इंडिया’ फेलोशिप) यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उपक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना वर्षभर स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, शाळेच्या परिसरातील २० ते २२ कुटुंबांनाही या प्रकल्पाचा थेट लाभ मिळणार आहे. विशेषतः पावसाळा आणि उन्हाळ्यात विहिरीवरून पाणी आणण्यासाठी महिलांना करावी लागणारी कष्टमय पायपीट आणि दगदग मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान उंचावण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रकल्पाच्या उभारणीत स्थानिक लोकसहभागाचे विशेष योगदान लाभले. शाळेच्या परिसरातील कुटुंबांनी तसेच विद्यालयातील शिक्षकांनी स्वतः आर्थिक योगदान देऊन प्रकल्पाला मोलाचे सहकार्य केले. संस्था आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागातून साकारलेला हा उपक्रम ग्रामीण विकासातील लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
यावेळी नेहा बोरकाटकी यांनी प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारेल, शाळेतील उपस्थिती वाढेल आणि त्यांना शिक्षणात अधिक प्रगती करण्यासाठी सक्षम वातावरण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालू धोंगडे, उपशिक्षक श्री घनशाम नवले, श्री तुकाराम बेणके श्री विजय बढे महादर्पनचे प्रतिनिधी श्री संतु जाधव,श्री नारायण धोंगडे, श्री अशोक लांघी, श्री पोपट भांगरे आणि बायफ–बी.आय.एस.एल.डी.चे सह जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री योगेश नवले, एस.बी.आय. ‘युथ फॉर इंडिया’ फेलो तारकराम रेड्डी, मार्टिकल मंथलू, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बायफ–बी.आय.एस.एल.डी, पुणे आणि एस.बी.आय ‘युथ फॉर इंडिया’ फेलोशिप यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत एस.बी.आय ‘युथ फॉर इंडिया’ फेलो तारकराम रेड्डी यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून शेणीत गावातील शाळा व ग्रामस्थांच्या गरजांचा अभ्यास करून हा उपक्रम साकारला. विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, शाळेत परसबागेसाठी पाण्याची सुविधा आणि परिसरातील २० ते २२ कुटुंबांना स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने सौरऊर्जेवर चालणारा पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात आला.
या उपक्रमासाठी बायफ–बी.आय.एस.एल.डी यांनी तांत्रिक मार्गदर्शन आणि एस.बी.आय ‘युथ फॉर इंडिया’ फेलोशिप यांनी आर्थिक सहकार्य, तर स्थानिक ग्रामस्थ व शिक्षकांनी आर्थिक लोकसहभाग दिला. त्यामुळे हा उपक्रम संस्था आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेला शाश्वत ग्रामीण विकासाचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
– सुरेश सहाणे
वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक
बायफ–बीआयएसएलडी, नाशिक.



