इतर

नेप्तीत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी, .

अहिल्यानगर : प्रतिनिधी

नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री चक्रधर स्वामी श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंडित परिवार आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या उत्सवाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

उत्सवाची सुरुवात पहाटे ५ वाजता झाली. मंदिराच्या तपस्विनी पुजारी राधाबाई पंडित यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाची विधिवत काकड आरती करण्यात आली. पहाटेच्या मंगलमय वातावरणात झालेल्या या आरतीने संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते. सकाळी १० वाजता अनिल पंडित यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गीता पारायणाचा कार्यक्रम संपन्न झाला, यामध्ये अनेक भाविकांनी सहभाग घेतला. ११ वाजता दत्तात्रय कवच पठण करण्यात आले. दुपारी बरोबर १२ वाजता ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक महाआरती व देवास उपहाराचा कार्यक्रम झाला. आरतीनंतर पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.

या उत्सवानिमित्त मंदिराला विशेष सजावट करण्यात आली होती. सार्थक पंडित, अमोल चौगुले ,मेघना पंडित, कृष्णा पंडित, अक्षरा पंडित, चैतन्य लोणारे, सुनील पंडित , कार्तिक खामकर यानी परिश्रम घेऊन मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली होती. तसेच संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिर परिसर रात्रीच्या वेळी उजळून निघाला होता. अशोक बोऱ्हाडे व अशोक लोणारे यांनी व ग्रामस्थांनी खिचडी तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. त्याबद्दल आनिल पंडित यांनी त्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

सायंकाळी नेप्ती येथील प्रसिद्ध एकतारी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भजनी मंडळाच्या सुमधुर भजनांनी आणि अभंगांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. रात्री दहा ते बारा या कालावधीत जंजिरे महाराज यांचे प्रवचन झाले. भाविक भक्त जंजिरा महाराज यांच्या प्रवचनात तल्लीन झाले होते .रात्रीचा मुख्य आकर्षण असलेला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव रात्री बरोबर १२ वाजता मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी महिला भगिनींनी पारंपरिक पाळणे गाऊन बाळकृष्णाला झोका दिला. उपस्थित सर्व भाविकांनी एका सुरात ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असा जयघोष करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. जन्मोत्सवानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्यासह परिसरातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंडित परिवार एकतारी भजनी मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button