आश्रम शाळांसाठी क्रीडासंकुल उभे करून खेळाडुंना प्रोत्साहन देणार – जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया

अकोले प्रतिनिधी
-आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरें क्रीडा नगरी शैक्षणिक संकुल मवेशी येथे दि .25 ते 27 डिसेंबर अखेर संपन्न होणाऱ्या राजूर प्रकल्पातील आश्रमशाळा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन अहिल्यानगर जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांचे हस्ते आज संपन्न झाले.
अंतिम सामन्याचे व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डाॅ पंकज आशिया यांनी वरील प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी अकोल्याचे तहसिलदार डाॅ. सिद्धार्थ मोरे,
मवेशी गावचे सरपंच श्री.यमाजी भांगरे,समाजसेवक अनिल भांगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले की,आपले जे आदिवासी विद्यार्थी आहेत ते शिक्षण क्षेत्रात प्रगती करत आहेत पण त्याचबरोबर त्यांच्यातील नैसर्गिक अंगिकृत गुण खेळामध्ये आहेत. राजूर आदिवासी प्रकल्पात चांगले खेळाडू घडत आहेत. त्याच्यासाठी जिल्ह्याची डीपीसीच्या योजनांतर्गत आश्रमशाळा साठी क्रीडासंकुल उभा करून आश्रमशाळा खेळाडुंना प्रोत्साहन देणार असल्याचे प्रतिपादन करून या स्पर्धेत आपण सर्व खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने भाग घेऊन यश संपादन करावे. ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ही स्पर्धा केवळ शारीरिक क्षमतेची परीक्षा नाही तर ती आपल्या अंगी असलेल्या सांघिक भावना, जिद्द आणि शिस्त दाखविण्याची एक महत्वाची पायरी आहे. आपला आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शेवटी डाॅ.आशिया यांनी केले.
राजुर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की,आदिवासी विकास विभागाच्या स्पर्धांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे वतीने दि.२२ एप्रिल २०१५ रोजीराज्यस्तरीय स्पर्धाचा दर्जा देण्यात आला. या शासन निर्णयामुळे राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय व निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ % आरक्षण मिळाले आहे. आपल्या विभागातील अनेक खेळाडूंनी या संधीचा लाभ घेतलेला आहे. तसेच राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूला १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत सवलतीने १५ गुण मिळतात याचाही लाभ आपल्या अनेक खेळाडूंनी घेतलेला आहे. आपणही या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .
कार्यक्रमासाठी मनोजकुमार पैठणकर,दिपक कालेकर प्रकाश ढोणे व सर्व प्रकल्प स्तरीय कमिट्यांचे अध्यक्ष शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.




