यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धां

निबंध स्पर्धेत पाटकर, कांबळे, बागुल प्रथम
नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हेमंत पाटकर, डॉ. सीमा कांबळे – सादळेकर आणि डॉ. विजय बागुल हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. संस्थेचे अध्यक्ष तथा कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी आज या निकालाची घोषणा केली.
मुक्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेच्या स्थापनेस अलीकडेच पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी महिलांच्या सबलीकरणात मुक्त विद्यापीठाचे स्थान, ज्ञानगंगा घरोघरी नेणारे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मुक्त विद्यापीठातून घेतलेल्या शिक्षणाची माझ्या दैनंदिन जीवनातील उपयुक्तता, मुक्त विद्यापीठामुळे शिक्षणाच्या खुल्या झालेल्या संधी, मुक्त विद्यापीठातून प्रौढांच्या शिक्षणाची स्वप्नपूर्ती आणि मुक्त व दूरस्थ शिक्षणामधील कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर (AI) या विषयांवर खुल्या निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक भागातील ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या निबंध स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक विभागून – हेमंत पाटकर, डॉ. सीमा कांबळे – सादळेकर, डॉ. विजय बागुल, द्वितीय क्रमांक विभागून – कुणाल कासार, डॉ. मंजूश्री नेव्हल, डॉ. विनायक लोहार तर तृतीय क्रमांक विभागून – श्रीमती आशा नळे आणि विजय अहिरराव हे मानकरी ठरले आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. प्रवीण घोडेस्वार, प्रा. सुभाष सोनुने, डॉ. पूनम वाघ आणि प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी काम पाहिले. विजेत्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र. कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या प्रा. संजीवनी महाले, कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे आदींनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सरचिटणीस डॉ. संतोष साबळे यांनी कळविले आहे.



