राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय व ठोकळवाडी जिल्हा परिषद शाळेत ग्रंथ दिंडी कार्यक्रम

एस. के. जाधव / प्रतिनिधी
कोकणवाडी दि. १४. अकोले तालुक्यातील राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठोकळवाडी येथे आनंद भंडारी साहेब (सीईओ) जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या संकल्पनेतून कुसुमाग्रज वाचन अभियान, ग्रंथ दिंडी व तेग बहादुर जयंती कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात ग्रंथ घेऊन प्रभात फेरी काढली. टाळ मृदंगाच्या गजरात संतांचे अभंग, गवळणी विद्यार्थ्यांनी आळवले.’ चला शाळेमध्ये जाऊ । वाचनाने समृद्ध होऊ॥ असा संदेश देत जनजागृती करण्यात आली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व अध्यक्षांची निवड केली.
यावेळी शिक्षक श्री घनश्याम नवले हे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले,” यशस्वी जीवन जगायचे असेल तर पुस्तकाला आपलं मित्र बनवला पाहिजे. वाचनाने माणूस समृद्ध बनतो. जीवनात किती समस्या आल्या तरी या ज्ञानाने त्या सोडवता येतात. पुस्तकांशी जीवनाचा मेळ घातला पाहिजे. मोबाईलच्या या युगामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन म्हणजे अभ्यास करणे व तसे आचरण करणे होय. ग्रंथ वाचून ज्ञान मिळवले तर समाजात आत्महत्या होणार नाहीत. माणसाचे मन वाईट विषयाकडे वळणार नाही. पुस्तकं हे मार्गदर्शक असतात. जगही ज्ञानी माणसांना स्वीकारतं. पाश्चिमात्य लोक अभ्यास करतात आपण पारायण करतो.” ग्रंथ म्हणजे फक्त धार्मिक पुस्तके नाहीत हेही त्यांनी अधोरेखित केले.
शिखांचे नववे धर्मगुरू गुरु तेग बहादुर सिंग यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त त्यांचे बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या संदेशाचे वाचन करून स्मरण करण्यात आले. धर्म, सत्य व न्यायासाठी दिलेले त्यांचे योगदान आजच्या पिढीस प्रेरणादायी असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर सर यांनी सांगितले.
जि. प. प्राथमिक शाळेचे श्री सुधाकर भांगरे म्हणाले,” माणसाने ग्रंथांना गुरु मानले पाहिजे ते घरात, कपाटात ठेवण्यासाठी नाहीत. आयुष्यात वाचन केले तर भविष्यात चांगले दिवस येतील, आयुष्य सुलभ होईल. कलियुगात सुखी जीवन जगण्यासाठी पुस्तकातील ज्ञान उपयोगी पडते म्हणून वाचनाचा छंद लावून घेतला पाहिजे. पुस्तकांमुळे दुःख दूर होते. मनावर संस्कार होतात, योग्य मार्ग सापडतो म्हणून वाचनाची सवय लावावी योग्य तेच वाचावे.
शेवटी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लालू कृष्णा धोंगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर , जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री तुळशीराम गभाले, महादर्पणचे प्रतिनिधी श्री संतु जाधव, श्री तुकाराम बेनके, श्री विजय बढे, श्री नारायण धोंगडे, श्री पोपट भांगरे, विठ्ठल धोंडे, नगालो तुकाराम रेड्डी, मार्टीकल मिंथालू, संस्थेचे खजिनदार श्री मुरलीधर तळपे, विठ्ठल धोंगडे व पालक उपस्थित होते.
श्री घनश्याम नवले यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.


