कामगार संहितांबाबत मजदूर संघाच्या सूचनांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा; – सुधांशू रानडे

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याचा ७२ वा वर्धापन दिन उत्साहात
पुणे, दि. 24 जुलै
भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने भारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व संघटनात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त लेडी रमाबाई हॉल, एस. पी. कॉलेज, टिळक रोड, पुणे येथे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विविध उद्योगांतील उद्योगप्रमुख, पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कामगार बांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे सभागृह खचाखच भरले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून भारतमाता, भगवान विश्वकर्मा आणि पूजनीय दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यानंतर पुणे जिल्ह्याचे सचिव श्री. सागर पवार यांनी मागील वर्षभरात भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याने विविध उद्योगांमध्ये केलेल्या संघटनात्मक कार्याचा, वेतनवाढ करारांचा, नवीन युनिट स्थापनेचा, सदस्य नोंदणी अभियानाचा, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी राबविलेल्या आंदोलनांचा तसेच विविध उपक्रमांचा सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालातून जिल्ह्यातील संघटनात्मक विस्तार, कामगारहितासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आगामी कार्यदिशेचा प्रभावी आढावा उपस्थितांसमोर मांडण्यात आला.
या मेळाव्यास भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सुधांशू रानडे, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्या श्रीमती तृप्ती आळती, भारतीय मजदूर संघाचे माजी अखिल भारतीय महामंत्री श्री. रवींद्र हिंमते, पुणे जिल्हाध्यक्ष श्री. अर्जुन चव्हाण, जिल्हा सचिव श्री. सागर पवार, प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती वंदना कामठे, प्रदेश सचिव श्री. ज्ञानेश्वर जाधव, तसेच विराज टिकेकर, हरी सोनी, विवेक ठकार, अजेंद्र जोशी, मनोज भदारके, गणेश टिंगरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, उद्योगप्रमुख, सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यास औद्योगिक क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, असंघटित क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, पुणे मेट्रो, बीडी उद्योग, रेल्वे, रिक्षा चालक, बांधकाम कामगार,, ओला , उबेर प्लॅटफॉर्म वर्कर्स, तसेच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, उर्से, चाकण, कुरकुंभ, शिरवळ आदी औद्योगिक परिसरांतील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना मा. सुधांशू रानडे यांनी भारतीय मजदूर संघाचा ७२ वर्षांचा गौरवशाली इतिहास, संघटनेची राष्ट्रवादी वैचारिक भूमिका, भारतीय कामगार चळवळीतील योगदान आणि भविष्यातील आव्हाने यांचा सखोल आढावा घेतला. बदलत्या औद्योगिक परिस्थितीत संघटन विस्तार, सदस्य नोंदणी आणि कामगारांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या चार कामगार संहितांबाबत (Labour Codes) भारतीय मजदूर संघाने विविध स्तरांवर सविस्तर सूचना व सुधारणा केंद्र सरकारसमोर मांडल्या असल्याचे सांगितले. तसेच मुंबई येथे झालेल्या भव्य मोर्चाद्वारेही कामगारांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या असून, सरकारने भारतीय मजदूर संघाने सुचविलेल्या सुधारणा सकारात्मकपणे स्वीकारून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
“कामगारांच्या हिताचे संरक्षण करणारे आवश्यक बदल सरकारने न केल्यास भारतीय मजदूर संघाला देशभर रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल,” असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सुधांशू रानडे यांनी दिला. त्यांच्या या घोषणेचे उपस्थित हजारो कामगारांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणाबाजी करून जोरदार स्वागत केले.

श्रीमती तृप्ती आळती यांनी आपल्या जपान दौऱ्यातील अनुभव कथन करताना भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त झालेली विश्वासार्हता, जागतिक कामगार चळवळीतील अनुभव आणि भारतीय मजदूर संघाच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमा दरम्यान जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण प्रास्ताविक मधे कामगारांच्या समोर आव्हाने बाबतीत मार्गदर्शन करु एकजूट ने मुकाबला करण्यास सज्ज रहावे असे मनोगत व्यक्त करण्यात आले. व उद्योगांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण मेळाव्यात संघटन, समर्पण, शिस्त आणि कामगार ऐक्याचे प्रेरणादायी वातावरण अनुभवास आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मनोज भदारके यांनी केले, तर श्री. जनार्दन शिवारकर यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय मजदूर संघाच्या “राष्ट्रहित – उद्योगहित – कामगारहित” या त्रिसूत्रीचा पुनरुच्चार करण्यात आला. देशहित, उद्योगहित आणि कामगारहित यांचा समतोल राखत संघटन अधिक बळकट करण्याचा तसेच कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.



