सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य पदी नियुक्ती.

अकोले : प्रतिनिधी
संसदीय कार्य आणि विधि विधान मंत्रालय, महाराष्ट्र शासन विभागाचे निवृत्त सचिव सतीश बबन वाघोले यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल यांच्या आदेशानुसार, संविधान कलम ३१६ आर्टिकल क्लॉज १ नुसार महाराष्ट्र शासनाच्या अॅडिशनल चिफ सेक्रेटरी व्ही. राधा यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांचे आदेशानुसार सतीश वाघोले यांची लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती केल्याची माहिती दिली आहे.
सतीश वाघोले हे मूळचे जुन्नर तालुक्यातील आळेगांव येथील असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य आणि विधि विधान मंत्रालय विभागाचे सचिव म्हणून तीस वर्षे कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागातील विधि आणि न्याय खात्यातील त्यांचा अभ्यासपूर्ण प्रदीर्घ कार्यकाळ तसेच न्याय विभागासंदर्भात त्यांनी आजवर लिहिलेली व्यासंग पूर्ण पाच स्वतंत्र पुस्तके दखलपात्र ठरली असून राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांनी त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन च्या सदस्य पदी सन्मानपूर्वक ही नियुक्ती केली आहे.
सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाच्या २ सप्टेंबर २०२६ रोजी निघालेल्या आदेशानुसार ही नियुक्ती पुढील सहा वर्षांकरिता असेल. सतीश वाघोले हे अकोले येथील साहित्यिक व संशोधक डॉ. सुनील शिंदे यांचे मेहूणे आहेत . वाघोले यांच्या नियुक्तीबद्दल माजी आमदार वैभव पिचड आणि डॉ. सुनील शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


