निमगाव फाट्यावर गोरक्षनाथांचा भंडारा उत्सव!

अहिल्यानगर : प्रतिनिधी –
नगर-कल्याण महामार्गावरील निमगाव वाघा फाटा येथील पुंड वस्तीवरील श्री गोरक्षनाथ मंदिरात सालाबादप्रमाणे श्री गोरक्षनाथ भंडारा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अभिषेक, विधिवत पूजा, कीर्तन, धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब पुंड व पुंड परिवाराच्या वतीने करण्यात आले होते
या उत्सवानिमित्त श्री गोरक्षनाथ मंदिर परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली होती. चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने, विविधरंगी रांगोळ्यांनी तसेच झगमगत्या विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. सजावटीमुळे मंदिर परिसराचे धार्मिक आणि प्रसन्न वातावरण अधिकच खुलून दिसत होते. सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी लगबग सुरू होती. ‘श्री गोरक्षनाथ प्रसन्न’ आणि ‘ॐ नमो आदेश’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

या उत्सवानिमित्त बाळासाहेब पुंड यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात श्री गोरक्षनाथ महाराजांना अभिषेक घालून विधिवत पूजा -अर्चा करण्यात आली . सामुदायिक आरतीचा कार्यक्रम झाला. प्राध्यापक भाऊसाहेब पुंड यांच्या हस्ते घनश्याम महाराज दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक दिलीप दाते ,माजी सरपंच अंबादास पुंड, माजी उपसरपंच फारुख सय्यद, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, बाळासाहेब पुंड, मच्छिंद्र पुंड , कचरू पुंड ,रवी पुंड ,किरण पुंड, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, प्राध्यापक भाऊसाहेब पुंड, योगेश वारुळे, समता परिषदेचे कार्यकर्ते, परिसरातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प. घनश्याम महाराज दळवी यांचे सुश्राव्य व प्रबोधनात्मक कीर्तन झाले. आपल्या ओघवत्या, रसाळ आणि प्रभावी वाणीने त्यांनी श्रावण महात्म्य, शिवपुराणातील विविध कथा तसेच श्री गोरक्षनाथ महाराजांच्या चरित्रावर निरूपण केले. भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर मेळ साधत त्यांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
श्रावण हा केवळ पूजा-अर्चेचा महिना नसून आपल्या जीवनात चांगले संस्कार रुजविण्याची संधी देणारा महिना आहे. देवाच्या मंदिरात येऊन माथा टेकविणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच देवाने दाखविलेल्या मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे. श्री गोरक्षनाथ महाराजांनी संयम, साधना आणि सदाचाराचा मार्ग समाजाला दाखविला. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात सत्य, सदाचार, परोपकार आणि सेवाभाव जोपासला पाहिजे. मंदिरातील भक्ती ही आपल्या आचरणात दिसली, तरच त्या भक्तीला खरा अर्थ प्राप्त होतो असे प्रतिपादन घनश्याम महाराज दळवी यांनी केले.
कीर्तन सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद ग्रहण केला. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा हा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
श्री गोरक्षनाथ भंडारा उत्सवाच्या निमित्ताने पुंड परिवाराने जपलेली धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकतेची भावना यंदाही अधोरेखित झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी समस्त पुंड परिवार व ग्रामस्थनी विशेष परिश्रम घेतले.


