इतर

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रयत्नांतून शिर्डी लोकसभा मतदार संघातील विकास कामांसाठी ४ कोटी चा निधी मंजूर

शिर्डी, दि. २५ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील २४ विविध विकासकामांसाठी ४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लोकसभा सदस्य भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी या कामांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ३० टक्के प्रमाणे १ कोटी ३० लाख ८० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. २३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णय क्रमांक साजियो-२०२६/प्र.क्र.९२५(१)/अजाक अन्वये २ कोटी ३८ लाख रुपयांच्या १५ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

यामध्ये अकोले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भवन विस्तारीकरण, कोपरगाव तालुक्यातील धामोरी व श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे संविधान भवन बांधकाम या प्रत्येकी ३० लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सांस्कृतिक भवन बांधकामासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. काकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण, करंजी येथील संत रविदास महाराज मंदिर सभामंडप, संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण संस्था प्रांगणातील सभामंडप, खंदरमाळी गावठाण अंतर्गत संत रोहिदास महाराज मंदिरासमोरील सभामंडप, आश्वी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहास संरक्षक भिंत व सुशोभीकरण, श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील संत रोहिदास महाराज मंदिर सभामंडप तसेच जळके खुर्द येथील आंबेडकर नगर दलित वस्ती सभामंडप या कामांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राहुरी तालुक्यातील करजगाव येथील दलित वस्ती स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये, तर करजगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे आणि श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील मातंग समाज अमरधाम येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याचप्रमाणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. २३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णय क्रमांक साजियो-२०२६/प्र.क्र.९२५/अजाक अन्वये २ कोटी रुपयांच्या ९ विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये अकोले नगरपंचायत, संगमनेर नगरपरिषद, कोपरगाव नगरपरिषद, श्रीरामपूर नगरपरिषद, देवळाली नगरपरिषद, नेवासा नगरपंचायत व राहता नगरपरिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील दलित वस्तीत समाजमंदिर बांधण्यासाठी १५ लाख रुपये, तर जेऊर कुंभारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मंजूर करण्यात आलेली ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत अथवा शासनाच्या अन्य कार्यान्वयीन यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहेत. कार्यान्वयीन यंत्रणांनी कामाचा आरंभबिंदू व शेवटचा बिंदू यांचे अक्षांश व रेखांश नमूद करून सविस्तर नकाशे व अंदाजपत्रके तयार करून ती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावीत, असे शासनाने निर्देश दिले आहेत. शासनाच्या प्रचलित नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून कामे मंजूर अंदाजपत्रकीय किमतीच्या मर्यादेत पूर्ण करावीत. मंजूर किमतीपेक्षा अधिक खर्च झाल्यास त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही.

कामे सुरू करण्यापूर्वी ती अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमधीलच असल्याची खातरजमा संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी करणे बंधनकारक आहे. वस्तीबाहेरील कामांना निधी वितरित झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रचलित नियमानुसार एकूण खरेदीपैकी २५ टक्के खरेदी सूक्ष्म व लघुउद्योगांकडून, तर ५ टक्के खरेदी अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडून करणे आवश्यक आहे. ही कामे इतर कोणत्याही शासकीय योजनेतून झालेली नसल्याची खातरजमा करून शासनाच्या सर्व अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button