इतर

विठ्ठल भक्ती म्हणजे बंधुभाव वाढवणे- अभिजीत औटी .

नेप्तीत आषाढी एकादशीनिमित्त खिचडीचे वाटप

अहिल्यानगर- प्रतिनिधी :

नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त अत्यंत भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. औटी कुटुंबीयांच्या वतीने श्री विठ्ठल- रुक्मिणीचा विधिवत महाभिषेक करण्यात आला. अभिजीत औटी यांच्या हस्ते पांडुरंगाची महाआरती करण्यात आली . हरिनामाचा गजर आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही औटी कुटुंबीयांनी खिचडीचे व केळी चे वाटप करून सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली. अभिजीत औटी व नारायण औटी यांच्या हस्ते भाविकांना फळे व खिचडीचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांनी चांगल्या पावसासाठी पांडुरंगाला साकडे घातल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली.


कार्यक्रमानिमित्त मंदिर परिसरात विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरू होता. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन घेऊन कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. औटी कुटुंबीयांनी अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू ठेवलेल्या या सेवाभावी उपक्रमामुळे परिसरातील नागरिक आणि वारकरी भक्तांमध्ये विशेष समाधानाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक परंपरा, समाजसेवा आणि भक्ती यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक सण नसून समाजाला एकत्र आणणारा आणि सेवाभावाची प्रेरणा देणारा दिवस आहे. विठ्ठलभक्ती म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर गरजूंना मदतीचा हात देणे, समाजात बंधुभाव वाढविणे आणि आपल्या संस्कृतीच्या परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. औटी कुटुंबीय अनेक वर्षांपासून ही सेवा अखंडपणे करत असून भविष्यातही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील. विठ्ठल भक्ती म्हणजे समाजात बंधुभाव वाढवणे असे प्रतिपादन अभिजीत औटी यांनी केले.
ते पुढे म्हणाले, मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून सामाजिक ऐक्याचेही प्रतीक आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना महाप्रसाद, फळांचे वाटप आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून विठ्ठलभक्तीची परंपरा अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. युवकांनीही अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांत सहभागी होऊन संस्कृती संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा आहे. प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात श्रद्धा, संस्कार आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होते.
यावेळी माजी सरपंच दिलीप होळकर, अभिजीत औटी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, प्राध्यापक एकनाथ होले , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, चेअरमन सुरेंद्र होळकर, अक्षय औटी, अमोल औटी, शौनक औटी, श्राव्या औटी, वेद औटी, शुभ्रा औटी, शुभंकर औटी , वंदना औटी, शोभा औटी, मीनल औटी, चैताली औटी, अश्विनी औटी ,संतोष कोतकर, पांडुरंग चौगुले, विष्णू गुंजाळ, शिवाजी जपकर, सिताराम बेल्हेकर, अशोक जपकर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button