इतर

ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि प्रतिबंधाची गरज – पल्लवी आल्हाट

आजच्या आधुनिक युगात विज्ञान तंत्रज्ञानामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीचे झाले आहे परंतु त्यासोबतच अनेक समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. वर्तमानाचा विचार करता शहरीकरण, औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा विस्तार यामुळे पर्यावरणीय प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

यातीलच एक प्रकार म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. वाहतुकीचे वाढलेले प्रमाण, अतिरेकी हॉर्न, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मशीन,मोटार मोठ्या यंत्रांच्या वापरामुळे होणारे आवाज, बांधकाम प्रकल्पात ड्रिलिंग मशीन,क्रेन बुलडोझर आणि इतर बांधकाम साहित्याचा होणारा आवाज तसेच हवाई वाहतुकीत विमाने हेलिकॉप्टर्समुळे निर्माण होणारे आवाज अनेक जाहिरातींसाठी प्रचार करणाऱ्या लाऊड स्पीकरचा आवाज, घरगुती साधने जसे मिक्सर, टीव्ही, वाशिंग मशीन, जनरेटर, कूलर ही सर्व साधने ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक आहेत.

ध्वनीप्रदूषण म्हणजे अतिउच्च अस्वस्थ करणारा आणि अनियंत्रित आवाज जो आपल्या सभोवतालच्या वातावरणात इतका वाढतो की तो मनुष्य प्राणी आणि पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम करतो. डीजे लाऊड स्पीकर व मोठ्या प्रमाणात आवाज करून नाचगाणी करणे हे आधुनिक काळातील ध्वनी हे निवासी क्षेत्रात होणाऱ्या प्रदूषणाचे सर्वात सामान्य स्रोत आहेत.
धार्मिक सण, सामाजिक उत्सव, वाढदिवस,लग्न आणि इतर कार्यक्रमांमध्ये बहुतांश वेळा जोरदार डिस्को,डीजे, संगीत वाजते आणि नियमापेक्षा अधिक आवाजात सुरू असते. सामाजिक उत्सवांमध्ये चालणारा संगीताचा आवाज आवश्यक प्रमाणात न ठेवता खूप जोरात ठेवला जातो.आसपासच्या रहिवाशांना त्रास देतो.कर्णकर्कश गाणे ,बँड वाहतुकीचे हॉर्न, फटाके इ.आवाजाचे रूपांतर ध्वनी प्रदूषणात होते.
आवाजाची तीव्रता डेसिबल या एककात मोजली जाते.डेसिबल जितका जास्त तितका आवाज अधिक तीव्र आणि हानिकारक असतो. शांतक्षेत्र जसे रुग्णालय, शाळा, निवासीक्षेत्र,व्यापारी क्षेत्र,औद्योगिक क्षेत्र या प्रत्येक क्षेत्राकरिता ध्वनीच्या मर्यादा डेसिबल पातळीप्रमाणे दिलेल्या आहेत. डेसिबल पातळी क्षमतेप्रमाणे सामान्य ध्वनी ३०ते ६०.डेसिबल इतका, मध्यम आवाज ६० ते ८५ डेसिबल इतके, जोरात डीजे, लाऊड स्पीकर ९०ते ११० पेक्षा जास्त डेसिबल इतका आणि १२० डी.बी.किंवा त्यापेक्षा अधिक आवाजाला उच्चतम ध्वनी आरोग्यास धोकादायक असे मानले जाते. ८५ डीबी पेक्षा जास्त आवाज दीर्घकाळ ऐकला तर त्रासदायक आरोग्यास हानिकारकच मानला जातो.
अतिउच्च ध्वनीचे जनजीवन वन्य प्राणी यांचे जीवन जलचर जीव,पक्षी यांच्यावर पर्यायाने पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. प्राण्यांचे पक्ष्यांचे कान तीक्ष्ण असतात त्यामुळे त्यांना आवाजाची तीव्रता अधिक प्रमाणात प्रभावित करते. प्राणी आवाजाच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी लपण्यासाठी सैरभैर पळतात अस्वस्थ होऊन त्यांची धडधड वाढते.आवाजाच्या त्रासामुळे अन्न शोधण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. हे प्राणी पक्ष्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे.यामुळे प्राणी प्रजनन प्रक्रियेवर परिणाम होतो . अडचणी निर्माण होतात. जलचरांचे देखील वर्तन बदलते.
माणसांवर गंभीर परिणाम दिसून येतात शारीरिक समस्या जसे काळजी,निद्रा विकार,रक्तदाब वाढणे, हृदयांच्या आजाराचा धोका वाढणे, श्रवणशक्ती कमी होणे मानसिक व भावनिक अस्वस्थता निर्माण होणे, चिडचिड वाढणे, एकाग्रता कमी होणे तनाव वाढणे, मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊन अभ्यासवरील लक्ष विचलित झाल्यामुळे निकालावर परिणाम होतो.संवेदनशील मनावर खोल दुष्परिणाम घडून येतात.
समाजात सण, नाट्य, कार्यक्रम, उत्सव हा आनंदाचा भाग आहे. पण त्याचे नियमन व पालन न झाल्यास लोकांचे आरोग्य बिघडते,जीवनमान कमी होते म्हणूनच व्यावसायिक, सामाजिक,पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांना नियम व कायदे यांचे पालन करावे लागते.जर त्यांचे उल्लंघन केल्यास दंड व बंदीचा धोका संभवतो.
भारतात ध्वनी प्रदूषण नियंत्रणा साठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने विविध कायदे व नियम लागू केले आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, तसेच नॉईस पोल्युशन रेगुलेशन अँड कंट्रोल रूल्स २०००, म्हणजेच ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम. हा विशेषता ध्वनी प्रदूषणाला लक्ष करणारा प्राथमिक कायदा आहे. या नियमानुसार निवासी क्षेत्रात रात्री दहा ते सकाळी सहाच्या सुमारास ४५डेसिबल पेक्षा जास्त आवाज निषीद्ध आहे. तसेच दिवसा इतर कार्यक्रमासाठी लायसन्स परवानगी आवश्यक.नसेल तर अधिकृतरित्या कारवाई होते. हल्लीच अहिल्यानगर मध्ये धनिप्रदूषणाविरोधात मोठी कारवाई केली गेली आहे.तसेच सामान्य नागरिकाला,परिसरातून अतिउच्च आवाजाचा त्रास होत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलीस खात्याकडून करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यक्रमांमध्ये हे नियम स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवून पाळले पाहिजेत. रुग्णालय,शाळा न्यायालय परिसरात ध्वनी प्रदूषण होईल अशा गोष्टी टाळाव्यात. नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात सर्वसामान्य व्यक्ती देखील या कायद्याच्या आधार घेऊन तक्रार दाखल करू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ६५ डेसिबल पेक्षा जास्त आवाज हा ध्वनी प्रदूषण ठरतो.पण माझ्या मते कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाच्या आरोग्याला घातक ठरणारा आवाज हा ध्वनिप्रदूषणच ठरतो. म्हणूनच एक जागरूक नागरिक या नात्याने आपण प्रत्येकाने याबाबत जनजागृती, सामाजिक जबाबदारी आणि नियमांचे पालन करू या. याद्वारे आपणास सण उत्सवाचा आनंदही राखता येईल आणि आरोग्य व नैसर्गिक संतुलनही.


पल्लवी संजय आल्हाट
शिक्षिका, व अध्यक्षा:

प्रेरणा बहुउद्देशीय फाउंडेशन सामाजिक संस्था, अहिल्यानगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button