प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न असावे – पद्मश्री राहीबाई पोपेरे

यशोदेव आणि साहित्य कुंज तर्फे स्रीशक्ती गौरव सोहळा !
संगमनेर प्रतिनिधी
“आज घराघरात रासायनिक फवारणी केलेला भाजीपाला सहजपणे वापरला जात आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न पोहोचावे, हेच माझे ध्येय आहे,” असे प्रतिपादन अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील महिला शेतकरी बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी केले.
वाढदिवस साजरा करताना केक-खर्च करण्याऐवजी रोपे भेट देऊन वृक्षलागवड करावी आणि निसर्गाशी नाते जपावे, असेही त्यांनी आवाहन केले. स्त्री ही कुटुंबाचा पाया असून तिचा सन्मान नेहमीच झाला पाहिजे, “प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न असावे हेच माझे ध्येय” असेही त्या म्हणाल्या.
साहित्य कुंज मासिक आणि श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्त्रीशक्ती गौरव सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. ज्योती मालपाणी होत्या.
अध्यक्षीय भाषणात अॅड. मालपाणी म्हणाल्या, “जागतिक महिला दिनापुरताच स्त्रीचा सन्मान मर्यादित राहू नये. वर्षातील उर्वरित ३६४ दिवसही स्त्रीवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारापासून तिचे संरक्षण झाले पाहिजे. कौटुंबिक हिंसाचारातून तिला आधार देणे ही समाजाची जबाबदारी आहे.”
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित महिलांमध्ये बीजमाता राहिबाई पोपेरे (कोंभाळणे), कुमारी राजश्री मोहिनी शांताराम देशमुख (पिंपरणे) – ज्यांनी दोन वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण करून तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले, प्रियंका बाळासाहेब बारगजे (प्रभू आडगाव, पाथर्डी) – अंधत्वावर मात करून IBPS स्पर्धा परीक्षेतून प्रोबेशनरी ऑफिसर झाल्या, मनिषा (संध्या) देशपांडे – मनिषा टायपिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापक, सुनंदाताई भागवत – नांदूर खंदरमाळ येथे पायाभूत सुविधा उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका रुपाली श्रीकांत गग्गड, उर्दू साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त दिलशाद मोहंमद ईद्रीस शेख, स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक सविता महेश गोडसे, आय स्किल अबॅकस अकॅडमीच्या संचालिका प्रियंका तनुष पठाडे आणि प्री-स्कूलच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्य करणाऱ्या शुभांगी भडांगे (चांगले) यांचा समावेश होता.

याचबरोबर ‘एक रविवार मातीसाठी’ हा स्वच्छता उपक्रम राबविणाऱ्या तेजश्विनी आदित्य घाटगे हिचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात साहित्य कुंज मासिकाच्या तिसऱ्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री यशोदेव नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपभाई शाह, चेअरमन सी.ए. हर्षल गुंदेचा, संचालक ललितांग शाह, संचालिका सौ.समृद्धी श्रीपाल ओहरा , सौ.आरती देवेंद्र बजानिया, साहित्य कुंज मासिकाचे संपादक अरविंद गाडेकर व कार्यकारी संपादक मनोज साकी उपस्थित होते.
प्रास्ताविक ललितांग शाह यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन साहित्य कुंज मासिकाचे उपसंपादक बाळासाहेब पिंगळे यांनी केले.
या कार्यक्रमास संगमनेर साहित्यिक मंडळ, आधार फाउंडेशन, जेष्ठ नागरिक महासंघ , संगमनेर वाचन कट्टाचे सभासद आणि संगमनेरकर नागरिक व पतसंस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


