नेप्ती परिसरात जनगणनेसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग,

“जनगणना देशाच्या विकासाचा पाया” — संभाजी कांडेकर
अहिल्यानगर/प्रतिनिधी–
नगर तालुक्यातील नेप्ती व परिसरातील निमगाव वाघा, हिंगणगाव, हमीदपूर,जखणगाव आदी भागात भारतीय जनगणना 2027 नुसार 16 मे 2026 ते 14 जून 2026 अखेर महाराष्ट्रात घरयादी व घरगणना करण्याचे आदेशित करण्यात आले असून त्यानुसार प्रत्यक्ष जनगणना मोहिमेला सुरुवात झाली आहे. नेप्ती व परिसरातही जनगणना कार्य उत्साही वातावरणात सुरू असून ग्रामस्थांकडून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भर उन्हात शिक्षकांनी घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे सुरू ठेवले आहे. गावातील नागरिक शिक्षकांना सहकार्य करत असून अनेक ठिकाणी चहा, पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करून त्यांचे स्वागत करत असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली.
नेप्ती येथील प्रगणक यादी गट क्र. 261 मध्ये जनगणना प्रगणक शिक्षक श्री बाळासाहेब भाऊसाहेब कड व संभाजी कांडेकर सर यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन जनगणनेतील 34 प्रश्नावलीच्या आधारे माहिती संकलित केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, शंकर फुले,जानकाबाई फुले व अन्य मान्यवर उपस्थित होते. कुटुंबातील सदस्य संख्या, शैक्षणिक स्थिती, रोजगार, निवास व्यवस्था तसेच विविध सामाजिक बाबींची माहिती काळजीपूर्वक नोंदवण्यात आली. कडक उन्हामुळे शिक्षकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असला तरी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे जनगणनेचे काम अधिक वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी शिक्षक संभाजी कांडेकर यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, “जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, सुविधा आणि निधी वाटपासाठी अचूक माहिती आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने खरी व अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “भर उन्हात काम करत असताना ग्रामस्थांकडून मिळणारे प्रेम, आपुलकी आणि सहकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे शिक्षक अधिक उत्साहाने जनगणनेचे कार्य पार पाडत आहेत. जनगणना ही केवळ सरकारी मोहीम नसून देशाच्या विकासाचा पाया आहे असे प्रतिपादन जनगणना प्रगणक शिक्षक संभाजी कांडेकर यांनी केले.
शिक्षक अतिशय जबाबदारीने जनगणनेचे काम करत आहेत. कडक उन्हात देखील त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचून शासनाचे महत्त्वाचे काम प्रभावीपणे पार पाडले आहे. गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपत होते. ग्रामस्थांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत जनगणना मोहिमेत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. . .



