इतर

आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास ‘रयत’ कटिबद्धः – चंद्रकांत दळवी

संगमनेर प्रतिनिधी

आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या काळाची पावले ओळखून जगातील अत्याधुनिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे, असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केला.

रयत शिक्षण संस्थेचे आश्वी इंग्लिश स्कूल व शांताबाई मुळचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालय, आश्वी बुद्रुक येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अशोक मुळचंदजी बोरा यांनी दिलेल्या १ कोटी रुपयांच्या देणगीतून साकारणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय इमारतीचे

भूमिपूजन २६ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून चंद्रकांत दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रोहित पवार, विशेष अतिथी थोर अॅड. अशोक बोरा, संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिदे आदी मान्यवर उपस्थित होते.

दळवी यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या ऐतिहासिक प्रवासाचा आढावा घेतला. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३ खंडांत ‘शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा’ तयार करून तो सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांना अभ्यासासाठी दिला गेला आहे. पवार साहेब वयाच्या ८६-८७

व्या वर्षीही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ सारख्या अत्याधुनिक विषयांचा सखोल अभ्यास करतात, हा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.

आमदार रोहित पवार म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी सर्वस्व अर्पण केले, तर लक्ष्मीबाईंनी स्वतःचे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवून शिक्षणाची ज्योत तेवती ठेवली. संपत्ती कितीही मिळवली तरी तिचा समाजासाठी कसा वापर होतो

यावर तिची खरी किंमत असते. अॅड. अशोक बोरा म्हणाले, माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण याच आश्वीच्या मातीत झाले. जीवनात जे काही

यश मिळाले, त्याचा पाया या शाळेने रचला आहे. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात मातृसंस्थेचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने मी ही देणगी दिली असून, या निर्णयात माझ्या संपूर्ण कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा राहिला.

या प्रसंगी मान्यवर सर्व सन्माननीय अॅड. संदीप वर्पे राजेंद्र चांदे, जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम, एकनाथ घोगरे, किरण पाटील, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सुमतीलाल गांधी, सतीश होडगर, गणेश बाळासाहेब गायकवाड, प्रभारी प्राचार्य दीपक चव्हाण, प्रभारी पर्यवेक्षक रमेश थेटे यांच्यासह आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, प्रतापपूर, उंबरी बाळापूर, डिग्रस, मालुंजे, आंभोरे परिसरातील ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button