ढोकेश्वर विद्यालय हे कलात्मक उपक्रमांचे माहेरघर- संजय पठाडे

पारनेर प्रतिनिधी
टाकळी ढोकेश्वर येथील अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री ढोकेश्वर विद्यालय हे कलात्मक उपक्रमांचे माहेरघर आहे, असे गौरवोद्गार जिल्हा कलाशिक्षक संघटनेचे संस्थापक गझलकार संजय पठाडे यांनी काढले.
ढोकेश्वर विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रावर नुकत्याच खेळीमेळीच्या वातावरणात शासकीय रेखाकला परीक्षा पार पडल्या. या वर्षी या केंद्रावर 695 विद्यार्थ्यांची परीक्षा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा कलाशिक्षक संघटनेचे संस्थापक गझलकार संजय पठाडे यांनी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यालयातर्फे प्राचार्य बाळासाहेब खिलारी यांच्या हस्ते पठाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कलाशिक्षकांना मार्गदर्शन करताना त्यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, या विद्यालयात प्रशिक्षित कलाशिक्षक नसताना विद्यालयाने रेखाकला परीक्षेचे केंद्र घेण्याचे धाडस दाखवले, ही बाब प्रशंसनीय आहे. ढोकेश्वर विद्यालयात सातत्याने विविध कलात्मक उपक्रम राबविले जातात याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी केंद्र संचालक प्राचार्य बाळासाहेब खिलारी, पर्यवेक्षक बाळासाहेब निवडुंगे, केंद्रचालक चित्रकार नारायण शेळके, फलकलेखनकार ज्ञानेश्वर कवडे, कलाशिक्षक कैलास विटनोर, विश्वनाथ धुमाळ, शरद आंधळे, शीतल आंधळे, एकनाथ पोटे, माध्यमिक सोसायटीचे संचालक पठारे उपस्थित होते.



