इतर

रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रयत मधून नवे एकलव्य घडत आहेत – संजय आवटे

संजय उकिरडे / प्रतिनिधी

सातारा दि.5 “बदलत्या युगात नवीन आव्हानांना सामोरे जात असताना १०७ वर्षांचा प्रदीर्घ वारसा असलेली रयत ही महत्त्वाची शिक्षण संस्था आहे. मन, मेंदू, मनगट यांचे एकात्म नाते असणारे विद्यार्थी घडवणे या काळात महत्त्वाचे आहे कर्मवीरांच्या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाचा वारसा पुढे घेऊन जाणे हीच आपली नैतिक जबाबदारी मानून आज रयत मधून नवे एकलव्य घडत आहेत “ असे प्रतिपादन थोर विचारवंत, वक्ते, लेखक व संपादक संजय आवटे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या १०७ व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे उपस्थित होते, याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष एम.बी. शेख, व्हा.चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारी खा.सुप्रियाताई सुळे, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खा. रामशेठ ठाकूर, आ.बाळाराम पाटील, जे.के.जाधव, अजित पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की, आधुनिक जग हे माध्यमांचे असून त्यांचा जपून वापर होणे आवश्यक आहे. समाजामध्ये बदल करण्याचे सामर्थ्य हे केवळ शिक्षकातच आहे. शिक्षणाने साधन म्हणून काम करीत असताना विचार समृद्ध आणि करिअरच्या नव्या वाटा धुंडाळणारा विद्यार्थी घडवणे महत्त्वपूर्ण आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विचार करणारी पिढी घडवणे हेच शिक्षकांसमोरील आव्हान आहे आणि रयतचे शिक्षक हे आव्हान लीलया पेलत आहे.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा परिचय करून दिला.


चेअरमन चंद्रकांत दळवी संस्थेच्या प्रगतीबाबत बोलताना म्हणाले रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याची भूमिका विषद केली. संस्थेच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीमध्ये रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
संस्थेचे सचिव किशोर राजेनिंबाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याचे चित्रफितिच्या माध्यमातून अनावरण झाले.
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयतील विद्यार्थी साहिल जाधव याने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक पटकावलेबद्दल संस्थेच्या वतीने त्याच्या पालकाचा सन्मान करण्यात आला. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ आदर्श विभाग, उपक्रमशील शाखा, उपक्रमशील शिक्षक, लाईफ वर्कर, लाईफ मेंबर, प्राचार्य, आदर्श स्वायत महाविद्यालये, आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी, विज्ञान शिक्षक, कार्यक्षम गुरुकुल प्रमुख इत्यादी पुरस्कार देण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षिकेचा सत्कार करण्यात आला.


सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले तर माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री.बी.एन.पवार यांनी पुरस्कारचे वाचन केले, कार्यक्रमास उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, अॅड. दिलावर मुल्ला इत्यादींची उपस्थिती होती. सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, कर्मवीर कुटुंबीय, आजीव सभासद, आजीव सेवक, विविध शाखांचे शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक,विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button