१२ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या सार्वत्रिक संपात भारतीय मजदूर संघ सहभागी नाही

पुणे दि 10
१२ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रस्तावित करण्यात आलेल्या सार्वत्रिक संपाला भारतीय मजदूर संघ ना पाठिंबा देणार आहे, ना त्यात सहभागी होणार आहे. हा संप काही केंद्रीय कामगार संघटना तसेच संयुक्त किसान मोर्चा यांनी पुकारलेला असून, तो राजकीय प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेला आहे.
भारतीय मजदूर संघाने सातत्याने ही भूमिका घेतली आहे की, चारही श्रम संहितांचे बीएमएस स्वागत करीत आहे, मात्र त्यापैकी दोन श्रम संहितांमधील काही तरतुदींविषयी बीएमएसने आपल्या हरकती व चिंता व्यक्त केल्या आहेत. बीएमएसने स्पष्ट केले आहे की वेतन संहिता व सामाजिक सुरक्षा संहिता या ऐतिहासिक व क्रांतिकारी आहेत, तर उर्वरित दोन संहितांमधील काही तरतुदींविषयी संघटनेला चिंता आहेत.
या सर्व मुद्द्यांवर १३ व २१ नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय मजदूर संघ व केंद्रीय श्रम मंत्री मा मनसुख मांडवीय यांच्यात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर श्रममंत्र्यांनी बीएमएसने मांडलेल्या हरकतींवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे व महामंत्री किरण मिलगीर यांनी दिली आहे.
याशिवाय, भारतीय मजदूर संघाने कामगार क्षेत्राशी संबंधित इतर अनेक मागण्या सरकारसमोर मांडल्या असून, त्या मागण्यांवरही योग्य प्रकारे विचार करून समाधान काढण्यात येईल, असे श्रममंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.
या आश्वासनांच्या आधारे, भारतीय मजदूर संघाने चारही श्रम संहितांच्या अंमलबजावणीसंदर्भातील अधिसूचनांचे स्वागत केले आहे.
भारतीय मजदूर संघ सरकारच्या सकारात्मक व कामगारहितैषी धोरणांना सातत्याने पाठिंबा देत आला आहे, तसेच कामगारांच्या हितांच्या विरोधात असलेल्या धोरणांचा ठामपणे विरोध करून त्याबाबत आपल्या हरकती मांडत राहिला आहे. भारतीय मजदूर संघ राजकीय प्रेरणेतून होणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी होत नाही, कारण श्रम क्षेत्राला राजकीय स्वार्थांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
म्हणूनच, भारतीय मजदूर संघ व संलग्न संघटना १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या कोणत्याही संपाला पाठिंबा देणार नाहीत व त्यात सहभागी होणार नाहीत. अशी माहिती भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे व प्रसिद्धी प्रमुख सागर पवार यांनी दिली आहे.



