नेप्ती विभाग अध्यक्षपदी फुले तर नागरदेवळे विभाग अध्यक्षपदी ताजने यांची नियुक्ती. .

अहिल्यानगर : प्रतिनिधी –
सकल माळी समाज ट्रस्ट अहिल्यानगरच्या वतीने संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने नेप्ती व नागरदेवळे विभागांसाठी नवीन अध्यक्षांची सकल माळी समाज ट्रस्ट अहिल्यानगर यांच्या माळीवाडा येथील बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अमोल भांबरकर होते. नेप्ती विभाग अध्यक्षपदी नगर तालुक्यातील नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास विठोबा फुले यांचा तीस वर्षाच्या सामाजिक कार्याचा विचार करून त्यांची तर नागरदेवळे विभाग अध्यक्षपदी संजय ताजने यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी ट्रस्टच्या वतीने दोन्ही मान्यवरांचा मोठ्या दिमाखात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना सकल माळी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले की, समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विभागीय स्तरावर समाजातील सक्रिय व समाजकार्याची आवड असलेल्या व्यक्तींना जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असून त्यासाठी ट्रस्ट सातत्याने कार्यरत राहील.
यावेळी नेप्ती विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष रामदास फुले म्हणाले की, समाजाने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीन.या आधीही विविध पदाच्या माध्यमातून मी अनेक सामाजिक कार्य केली आहेत.वेळप्रसंगी आंदोलने करून समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. तरीही अजून अनेक प्रश्न बाकी आहेत. ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी आहे .समाजातील तरुणांना एकत्र करून सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल.
पुढे बोलताना फुले यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. समाजातील समस्या समजून घेऊन त्यावर योग्य त्या पातळीवर पाठपुरावा केला जाईल तसेच समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्यात येईल.समाजाने दिलेली जबाबदारी ही मोठी असून ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. समाजातील गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल. समाजातील युवक व महिलांना संघटनात सक्रियपणे सहभागी करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील. समाजातील प्रश्न शासन दरबारी मांडून ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करून समाज संघटना मजबूत करण्याचा रात्रं-दिवस मनापासून प्रयत्न करणार असे प्रतिपादन नेप्ती विभाग अध्यक्ष रामदास फुले यांनी केले .
यावेळी सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले ,उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सचिव राजेंद्र पडोळे, विश्वस्त विनोद भाऊ पुंड, रमेश चिपाडे, कोर कमिटी सदस्य अनिल इवळे, अमोल भांबरकर तसेच अनिल लोंढे,लवेश गोंधळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दोन्हीही नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन करून त्यांना पुढील समाजकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
——-


