इतर

कर्वे संस्थेच्या एम.एस.डब्ल्यू. विद्यार्थ्यांची भारतीय मजदूर संघ कार्यालयास शैक्षणिक भेट

पुणे, दि. 21 ऑगस्ट : कर्वे सामाजिक संस्थेच्या (Karve Institute of Social Service) एम.एस.डब्ल्यू. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय मजदूर संघ, पुणे कार्यालयास शैक्षणिक अभ्यासभेट दिली. प्रा. डॉ. चित्रा राजूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व समन्वयातून आयोजित करण्यात आलेल्या या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना कामगार चळवळ, कामगार संघटनांची भूमिका, औद्योगिक संबंध तसेच संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या यांची प्रत्यक्ष माहिती करून देणे हा होता.

यावेळी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय मजदूर संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. देशातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांसाठी भारतीय मजदूर संघाने केलेले योगदान, कामगार चळवळीतील अनुभव, वेतन करार (Wage Settlement), सामूहिक वाटाघाटी, औद्योगिक शांतता तसेच राष्ट्रीय हित जपत कामगारांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्याची संघटनेची भूमिका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

सध्याच्या बदलत्या औद्योगिक व आर्थिक परिस्थितीत कामगार जगतासमोरील आव्हाने, कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांचे प्रश्न, सामाजिक सुरक्षा, किमान वेतन, ईएसआयसी, पीएफ, कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, कौशल्य विकास आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी याबाबतही विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.

भारतीय मजदूर संघाची ‘राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहित’ या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धती, संघटन उभारणी आणि धोरणात्मक भूमिका याविषयीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारून औद्योगिक संबंध, कामगार संघटनांची उभारणी, संघटन नेतृत्व, सामूहिक वाटाघाटी आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन घेतले. प्रत्यक्ष कामगार चळवळीशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा सचिव सागर पवार तसेच संघटन सचिव उमेश विश्वाद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कामगार कल्याण आणि समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी भारतीय मजदूर संघाच्या कार्याची प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button