घाटघर-भंडारदऱ्यात १४ व १५ नोव्हेंबरला दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन

निसर्गसंवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत पर्यटनावर होणार मंथन;
अकोले, प्रतिनिधी :
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन १४ व १५ नोव्हेंबर रोजी घाटघर इको सिटी–भंडारदरा, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथे होणार आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत होणाऱ्या या संमेलनाच्या नियोजनासाठी अकोले येथे सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. पर्यावरण संवर्धनासोबतच जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे होते. मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांनी प्रास्ताविकातून संमेलनाची संकल्पना, उद्दिष्टे आणि नियोजनाची रूपरेषा मांडली. राज्यभरातून संमेलनासाठी येणाऱ्या पर्यावरणप्रेमींचे स्वागत, निवास, भोजन, वाहतूक, कार्यक्रमांचे नियोजन तसेच विविध सत्रांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पद्मश्री राहीबाई पोपेरे या १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाला प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बीजसंवर्धन, पारंपरिक वाणांचे जतन आणि जैवविविधता संवर्धनासाठी केलेल्या त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या सहभागातून बीजसंवर्धन आणि निसर्गरक्षणाचा संदेश राज्यभर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
घाटघर-भंडारदरा परिसर हा सह्याद्रीच्या निसर्गसंपदेने समृद्ध असून या परिसरातील वनसंपदा, जलस्रोत, जैवविविधता आणि निसर्गसौंदर्याचे संवर्धन करताना पर्यटनाचा शाश्वत विकास कसा साधता येईल, यावर संमेलनात विचारमंथन होणार आहे.
वनविभाग, पर्यटन क्षेत्र, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणे, प्लास्टिक प्रदूषण रोखणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि स्थानिक नागरिकांचा पर्यावरण संवर्धनातील सहभाग वाढविणे, या विषयांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून चर्चा होणार आहे.
संमेलनाचे प्रमुख पाहुणे, व्याख्याते, विविध सत्रांचे स्वरूप आणि कार्यक्रमांची रूपरेषा याबाबतही नियोजन बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राज्याच्या विविध भागांतून पर्यावरणप्रेमींचा सहभाग वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले.
यावेळी प्रसिद्ध उद्योजक अजित जगधने यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या अहिल्यानगर जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातील पर्यावरणविषयक उपक्रमांना संघटनात्मक बळ देण्यासाठी आणि विविध घटकांमध्ये समन्वय साधण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
बैठकीचे सूत्रसंचालन राज्य संघटक चंद्रशेखर हासे यांनी केले, तर प्रवीण मालुंजकर यांनी आभार मानले.
यावेळी गर्दणीचे उपसरपंच नारायण जगधने, माजी सरपंच लक्ष्मण दिघे, उंचखडकचे सरपंच महिपती देशमुख, राजीव देशमुख, मुख्याध्यापक विलास सावंत, कार्याध्यक्ष विजय पांडे, राज्य उपाध्यक्ष प्रकाश केदारी, डॉ. अनिल लोखंडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, सतीश नेहे साहेब, गणपत धुमाळ, सखाराम मेसे, शेटे सर, एकनाथ दिघे, किसन पिचड, किशोर धुमाळ, सचिन चासकर, रामनाथ भोजने, शोभा लांडगे, संदीप मालुंजकर, सुरेश वाकचौरे, शरद कडलग यांच्यासह अकोले व संगमनेर तालुक्यातील पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१४ व १५ नोव्हेंबर रोजी घाटघर-भंडारदरा येथे होणारे हे संमेलन पर्यावरण संवर्धनासोबतच सह्याद्रीच्या निसर्गसंपदेचे संरक्षण, जबाबदार पर्यटन आणि स्थानिक सहभाग यांना व्यापक दिशा देणारे ठरणार असून राज्यातील पर्यावरणप्रेमींसाठी विचारांची आणि कृतीची नवी दिशा देणारे व्यासपीठ ठरणार आहे.
संजय उकिरडे



