कुंभार समाजाच्या विकासा साठी महामंडळाला विशेष अनुदान देण्यात येईल – महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे

छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी
सकल कुंभार समाजाच्या उद्धारासाठी संत गोरोबाकाका आर्थिक विकास महामंडळ गठीत झाले आहे. पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कॅबिनेटमध्ये रितसर मंजुरी घेण्यात येईल. समाजाच्या प्रश्नांची सोडणूक करून कुंभार समाजातील महिला आणि युवकांना सक्षम बनविण्यासाठी महामंडळाला विशेष अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले
कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र प्रदेश आयोजित राज्यस्तरीय मेळावा आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते.
याप्रसंगी मंत्रि महोदयांच्या हस्ते नामदेव मरकड, ध्रुपदाबाई मरकड, उमाजी सूर्यवंशी आणि शोभाबाई सूर्यवंशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाठ, आमदार प्रशांत बंब, आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये,
माजी खासदार डॉ. भागवत कराड, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, बापू घडामोडे, सतीश दरेकर, रमाकांत क्षीरसागर, मनोहर तांगडे, मच्छिंद्र.जगदाळे, अनिल कुंभार, छाया खाजेकर, रामेश्वर भादवे, संजय जोरले, संजय गाते, किरण पाटील, संजय खंबायते यांची प्रमुख उपस्थिती होती.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, संत गोरोबाकाकांनी माती आणि इश्वर हा जिवनाचा महत्वपूर्ण असा सर्वोच्च संदेश
समाजाला दिला. भक्तिभावात समरस झालेला कुंभार समाज धार्मिक आणि संस्कारक्षम आहे. एवढेच नव्हे तर कुंभार समाजाचे संस्कार देशाला तद्वतच महाराष्ट्राल मजबूत करणारे आहेत. संजय जोरले यांच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चाद्वारे संत गोरोबाकाका महामंडळाची आग्रही मागणी केली होती. नेत्यांना सोबत घेवून संत गोरोबाकाका आर्थिक विकास महामंडळ गठीत करण्यात आले आहे.
इमाव व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे म्हणाले की सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, आकार देणारा कुंभार समाज माझ्याच विभागाचा एक घटक आहे.आचारसंहिता संपल्यानंतर महामंडळाला मंजुरी घेतली जाईल. प्रारंभी संजय जोरले आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि श्रीफळ
देवून स्वागत केले.



