इतर

नातवंडानी केली आजीची एकसष्टी साजरी!


श्रीरामपूर (वार्ताहर ) आजच्या तंत्रज्ञानी युगात कुटुंब संस्थेत विस्कळीतपणा आला आहे, अशा स्थितीत आपला गोतावळा एकत्र येणे दुर्लभ झाले आहे. श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी बाबुराव उपाध्ये यांचा ६१ वा वाढदिवस खाऊसाठी मिळालेले पैसे स्वखर्चातून आजीची एकसष्टी आनंदाने साजरी केली. त्याबद्दल नातवांचे अनेकांनी कौतुक केले.
नातवंडांनी प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन केले. श्रीराम अबॅकस वलासच्या संचालिका प्रा. सौ. पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांनी छोट्या नातवंडाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. आजी – आजोबांनी कधी तथाकथित वाढदिवस साजरा केला नाही. पितृ पंधरवाडा काळात आपल्या गेलेल्या मातापित्यांना खाऊ पिऊ घातले जाते. ऋणानुबंध जपले जाते, परंतु जिवंतपणीच मुलांनी, नातवंडांनी आपल्या, आजी आजोबांना, मातापित्यांना मनापासून जपावे, आनंदीत ठेवावे, ही आपली संस्कृती वाढली पाहिजे. म्हणूनच नातवंडांनी एकत्र येत आग्रहाने आजीची एकसष्टी साजरी केली, हे कौतुकास्पद आहे, असे प्रा. सौ. सैंदोरे यांनी सांगितले. श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी नातवंडाचे भरभरून कौतुक केले. कुटुंबसंस्था ही निर्मळ नात्यातून टिकून राहते. आजच्या काळात मोबाईलमय झालेली पिढी घरात मोठ्यांचे ऐकत नाही. उलट बोलतात, नको ते करतात, पैसा, मानपान आणि रागातून आजी आजोबा, आईबाप, शिक्षक यांनाही उलट मारण्यास धजतात. प्रसंगी घरातच चोरी करतात. अलिकडे अशा घटना घडल्या आहेत. नात्यातील जणू प्रेमाचे, आपुलकीचे प्रेमझरे आटले की काय ? आपण कोणती प्रगती करीत आहोत ? संस्कार केंद्र हरवले आहे. अशा स्थितीत ज्या आजीने कधी वाढदिवस दिमाखात साजरा केला नाही, अशा आजीची एकसष्टी स्वखर्चातून नातवंडांनी साजरी केली, हे संस्कृतीचे शुभभूषण असल्याचे मत डॉ. उपाध्ये यांनी व्यक्त केले. निर्मिक उपाध्ये, आराध्या सैंदोरे, प्रथमेश जोर्वेकर, धनश्री सैंदोरे, श्रीराम सैंदोरे, कार्तिक जोर्वेकर, कृष्णा सैंदोरे आदी नातवांनी शुभेच्छा दिल्या. काही नातवांनी आजीचे औक्षण करीत पूजन केले, आशीर्वाद घेतले, आजीचे कौतुक केले. आजीने भरल्या डोळ्यांनी नातवंडांना शाबासकी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button