खेळातून भविष्यातील करिअरच्या संधीं मिळतात .जिल्हा क्रीडा अधिकारी – ज्ञानेश्वर खुरांगे
राजूर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धाचें मवेशी शैक्षणिक संकुलात उद्घाटन
अकोले-(प्रतिनिधी)
एकात्मिक आदि.विकास प्रकल्प राजूर प्रकल्पांतर्गत तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे मवेशी येथील क्रांतिवीर राघोजी भांगरे क्रीडानगरी मवेशी शैक्षणिक संकुल येथे आज उद्घाटन संपन्न झाले सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.खुरांगे बोलत होते.
प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आज दि. २६ रोजी उत्साहात उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धेत राजूर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या २१ शासकीय व १८ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळांमधील केळी रुम्हणवाडी, केळी कोतुळ, अकलापूर आणि मवेशी या चार केंद्रांतील केंद्रस्तरीय स्पर्धेत यशस्वी ठरलेले ५१० मुले व ५८४ मुली असे एकूण १,०९४ खेळाडू सहभागी झाले आहेत. या प्रकल्पस्तरीय स्पर्धेत विजयी होणारे खेळाडू पुढील टप्प्यात धुळे येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. किरणजी लहामटे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास विभाग, नाशिकचे उपआयुक्त मा. राजेंद्रकुमार हिवाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे व राजूर पोलीस स्टेशनचे पीआय किशोर पवार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे उपस्थित आज २६ नोव्हेंबर ‘संविधान दिन’ आणि २६/११ च्या शहीदांचा स्मृतिदिन असल्याने, सर्वप्रथम शहीदांना भावपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली. यानंतर सर्व मान्यवर, खेळाडू व शिक्षकांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले आणि खेळाडूंना खिलाडूवृत्तीची क्रीडा शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे यांनी दिनांक २६ ते २८ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या संपूर्ण तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाची रूपरेषा व नियोजनाची माहिती दिली. यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात सुदृढ शरीरासाठी खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असुन
प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक खेळ प्रकारात नैपुण्य मिळवून त्याद्वारे करीअरच्या संधी शोधाव्या असे उदबोधित
केले. प्रमुख पाहुणे उपआयुक्त राजेंद्रकुमार हिवाळे यांनी खेळातील भविष्यातील करिअरच्या संधीं विषयी मार्गदर्शन करत आश्रमशाळांतून उत्तम खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात तालुक्याचे आमदार डॉ. किरणजी लहामटे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले.
सदर उदघाटन पर कार्यक्रमात साहित्यिक श्री.आदिनाथ सुतार यांच्या ‘सह्याद्रीचे
शौर्यतारे’ या आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे, सहा. प्रकल्प अधिकारी दीपक कालेकर, सहा. प्रकल्प अधिकारी प्रकाश ढोणे, सांख्यिकी अधिकारी शंतनु डांगे, उपलेखाधिकारी दत्तात्रेय धाडवड वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक कमलाकर हंडीबाग,मवेशीचे सरपंच यमाजी भांगरे,माजी सरपंच कमलताई बांबळे व सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ गायकवाड व मुकुंद सूर्यवंशी यांनी केले. या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.शिवराज कदम,शिवाजी नरके,पंडित कदम, चंदन बडवे,किशोर शिंदे जगन्नाथ जाधव मेजर बांबळे सह विविध शाळांचे मुख्याध्यापक व विविध समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व समिती सदस्य, खेळाडू तसेच पीआरटीसीचे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेशकुमार कागदे, रोहिदास वाघचौरे, प्रकाश नारकर, भूषण साठे, मंगल लोंढे, अधीक्षक भाऊसाहेब पटेकर यांच्यासह सर्व आश्रमशाळांचे शिक्षक, अधीक्षक, स्त्री अधीक्षिका, क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
