ठोकळवाडी ता अकोले येथे संविधान दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी – श्री. एस. के. जाधव
शेणीत, दि. २६ नोव्हेंबर :
राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय, ठोकळवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठोकळवाडी (शेणीत) येथे भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब दातीर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानातील मूलभूत तत्त्वे तसेच नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले,” संविधानावर देशातील लोकशाही व्यवस्था आधारलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन संविधान तयार केले आणि 26 नोव्हेंबर 1950 रोजी हे संविधान देशासाठी बहाल केले. संविधानाच्या कलमावर आधारित 1952 ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान,राष्ट्रपती,मंत्रिमंडळ यांच्या नेमणुका झाल्या. मंत्रिमंडळ अस्तित्वात आले.

त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य भारताचा राज्यकारभार संविधानावर आज पर्यंत चालू आहे. शिक्षण, नोकरी यांचे श्रेय डॉ.बाबासाहेबांना जाते. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजासाठी महान कार्य केले.संविधानामुळे प्रत्येक क्षेत्रात महिला उच्च पदावर काम करताना दिसतात हे भूषणावह आहे. राष्ट्रपतीपदावर सुद्धा महिला विराजमान होते हे देशासाठी गौरवाचा विषय आहे. खऱ्या अर्थाने जे समाज सुधारक होऊन गेले त्यांनी देशासाठी स्वतःला वाहून घेतले ते कधीच स्वार्थी जगले नाहीत त्यांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी जीवन जगले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशा प्रकारचे मंत्र त्यानी आपल्याला दिले. त्यांच्या विचारांचा आचारांचा आपण अंगीकार केला पाहिजे त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे. मोबाईलच्या वापरामुळे जीवन संकुचित बनत आहे मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे.” ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी संविधानाने दिलेल्या मूल्यांचा आदर करून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन व संविधान पालनाची शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमास श्री. घनशाम नवले, श्री. तुकाराम बेणके, श्री. विजय बढे, श्री. नारायण धोंगडे, श्री. पोपट भांगरे, श्री. अशोक लांघी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर भांगरे, त्यांचे सहकारी श्री. भीमराज कदम, महादर्पणचे प्रतिनिधी श्री. संतु जाधव, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. घनशाम नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


