इतर

अहिल्यानगरमध्ये “बाल अत्याचार मुक्त जिल्हा अभियान”चा शुभारंभ

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा होणारा बालदिन हा मुलांच्या हक्कांचा, स्वप्नांचा आणि सुरक्षित भविष्यातील बांधिलकीचा उत्सव आहे. त्यांच्या मुलांप्रती असलेल्या अपार प्रेमामुळे साजरा होणारा हा दिवस केवळ आनंदाचा नसून समाजाला बालहक्कांचे महत्त्व स्मरण करून देणारा संदेशवाहकही आहे. या बालदिनाचे औचित्य साधून यावर्षी अहिल्यानगर जिल्ह्यात मुलांच्या संरक्षणासाठी एक ऐतिहासिक उपक्रम सुरू होत असून “बाल अत्याचार मुक्त जिल्हा अभियान” या व्यापक मोहिमेचा भव्य शुभारंभ करण्यात येत आहे.

या अभियानाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आनंद भंडारी यांच्या हस्ते होणार आहे. बालहक्क संरक्षणाच्या दिशेने जिल्हा प्रशासन, स्नेहालय आणि विविध शासकीय विभाग यांनी घेतलेले हे संयुक्त पाऊल जिल्ह्याच्या बालसुरक्षेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम, बालकल्याण समिती अध्यक्ष जयंत ओहळ,सदस्य ॲड अनुराधा येवले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड, तसेच मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष श्री. मन्सूर शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येने चिमुकल्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला वेगळेच उत्साही वातावरण देणार असल्याचे प्रकल्प मानद संचालक बागेश्री जरंडीकर यांनी माहिती दिली.

या उपक्रमाचा केंद्रबिंदू असलेली “मुक्ती वाहिनी” ही स्नेहालयच्या उडान प्रकल्पांतर्गत राबविली जाणारी २४×७ कार्यरत बालहक्क संरक्षण हेल्पलाईन आहे. हरवलेली, शोषित, संकटग्रस्त मुले तसेच बालमजुरी किंवा बालविवाहाच्या धोक्यातील बालकांना तात्काळ मदत पोहोचवणे, कायदेशीर सहाय्य, समुपदेशन, आरोग्यसेवा, शिक्षण व पुनर्वसन हे सर्वसमावेशक कार्य मुक्ती वाहिनीमार्फत करण्यात येते. पोलिस विभाग, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण यंत्रणा, आरोग्य व शिक्षण विभाग इत्यादींसह घनिष्ठ समन्वय ठेवत मुक्ती वाहिनी बालकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांमध्ये बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, बालकांवरील कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला शून्य सहनशीलता ठेवणे, तसेच मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे या प्रमुख उद्देशाने या अभियानाची सुरुवात होत आहे. बालदिनाच्या महत्त्वपूर्ण दिवशी सुरू होणारा हा उपक्रम चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुरक्षित वातावरणासाठी जिल्ह्याच्या सामूहिक बांधिलकीचे प्रतीक ठरणार आहे.

अहिल्यानगर जिल्हा बालसुरक्षेच्या दिशेने केवळ पावले उचलत नाही, तर एक ठोस, परिणामकारक परिवर्तनाची तयारी करत आहे. पंडित नेहरू यांनी ज्या “उद्याच्या भारताला सक्षम नागरिक” घडविण्यासाठी बालकांच्या हक्कांवर भर दिला त्या विचारांना कृतीरूप देणारी ही मोहीम निश्चितच जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button