अकोल्यात घरगुती गॅस चा काळाबाजार वाढला पुरवठा विभागाने लक्ष घालण्याची मागणी

अकोले (प्रतिनिधी)
आखातातील देशांच्या युद्धामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहता केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि मोठ्या उद्योगांना एलपीजी सिलिंडर देण्यावर बंदी घातली.आता हा गॅस केवळ घरगुती वापरासाठीच पुरवण्यात येईल. या गॅसचा पुरवठा केवळ सरकारी कंपन्यांद्वारेच करता येणार आहे. असा आदेश केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काढला आहे.
मात्र एकीकडे व्यावसायिक गॅस मर्यादा व बंदी असताना दुसरीकडे घरगुती ग्राहकांनाही वेळेवर सिलिंडर (गॅस टाकी) मिळेनासे झाले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार वाढत आहे याकडे पुरवठा विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदन
अकोले ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेच्या वतीने अकोले महसुलचे नायब तहसीलदार प्रमोद सावंत यांना देण्यात आले
मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचा आदेश पालन करणे कार्यालयीन पत्र. क्रमांक पुरवठा/कार्या जि.पु.2/ रॉकेल/267/2019 आदेश अहमदनगर दि.3/1/2020 नुसार अटी व शर्तीचे पालन करणे गॅस वितरकाने 100% रिफिलिंग सिलेंडर विक्री ग्राहकांना घरपोच करावयाची आहे. गॅसवितरकांचे कार्यालयाच्या बाहेर साठ्याबाबत ग्राहकांना दिसेल अशी दर्शनी भागात ठिकाणी कायमस्वरूपी फलक लावणे आवश्यक आहे. सदरचे फलकावर दररोज असणारा साठा, विक्री, शिल्लक साठा व रिफिलिंग सिलेंडरच्या दराची नोंद करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचा आदेश अनुसरून अटी व शर्ती क्रमांक 1 ते 20 मधील गॅस एजन्सी वितरकांना तंतोतंत पालन करण्यास आपल्या विभागाने लक्ष देऊन घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना वेळेवर मिळावे व घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार होणार नाही याकडे लक्ष द्यावे. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक,अध्यक्ष दत्ता शेणकर सचिव राम रुद्रे, वसंतराव बाळसराफ, रामदास पांडे, सचिन जोशी, भाऊसाहेब वाकचौरे, धनंजय संत, मच्छिंद्र चौधरी, सुशांत वाकचौरे, संतोष खांबेकर, सखाराम खतोडे, ज्ञानेश्वर चौधरी आदींच्या सह्या आहे .



