कृषी

वातावरणातील बदलाशी सुसंगत शेतीची गरज-योगेश नवले

अकोले प्रतिनिधी, दि. 4


मुथाळणे (ता.अकोले) येथे जनरल मिल्स आणि बाएफ पुरस्कृत ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणाशी जुळवून घेऊन शाश्वत शेती करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना सह जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश नवले यांनी सांगितले की, “सध्याच्या हवामान बदलाचा थेट परिणाम पिकांवर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणाशी सुसंगत व तग धरणारी पिके घेण्यास प्राधान्य द्यावे. जमिनीची आरोग्य पत्रिकावरून जमिनीच्या सुपीकतेनुसार पिकांची निवड केली पाहिजे. एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, जैविक निविष्ठांचा वापर, पिकांची फेरपालट, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच शाश्वत शेती शक्य आहे.”


जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश लांडगे यांनी शेतकऱ्यांना पाण्याचे बजेटिंग,पाण्याचा योग्य वापर, पिकांची पाण्याची गरज आणि उपलब्ध पाण्याच्या जोरावर पिकांची योग्य निवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आंबा फळबाग लागवड केलेल्या शेताला भेट देऊन आंब्याच्या झाडाला करावयाचे आळे, पाणीव्यवस्था आणि आधार याबाबतचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुथाळणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच किसन होलगीर यांचेसह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक सुरेश सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक शुभम नवले व किरण आव्हाड यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button