संदीप वाकचौरे यांचे शिक्षणाचे पसायदान आता ब्रेल लिपीत!

अंध वाचकांना मिळणार संत साहित्यातील शिक्षण विचार
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर येथील लेखक , पत्रकार संदीप वाकचौरे यांचे शिक्षणाचे पसायदान हे चपराक प्रकाशाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक ब्रेल लिपीमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील अंधवाचकांना संत साहित्यातील शिक्षण विचार समजून घेण्यास मदत होणार आहे. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याची माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली.
ब्रेल लिपीत तयार होणाऱ्या या पुस्तकांच्या प्रती राज्यातील ४२ अंधशाळांतील विद्यार्थ्यांना तसेच ग्रंथालयांना भेट दिल्या जाणार आहेत. शिक्षणाचे पसायदान या पुस्तकाच्या आतापर्यंत तीन आवृत्त्या संपलेल्या आहेत. अवघ्या पंधरा दिवसांमध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली होती. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील ओव्यांमध्ये त्यांनी व्यक्त केलेला शिक्षण विचार अशा स्वरूपाची मांडणी या पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे. हे पुस्तक ब्रेल लिपी मध्ये येणार असल्यामुळे मराठी अंधवाचकांना हा नवा विचार समजून घेण्यास मदत होईल.

99 अखिल भारतीय साहित्य संमेलनात ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन अनोखे ठरणार आहे. या पुस्तकांचे निमित्ताने दृष्टिहीनांसाठी ज्ञानाचे आणखी एक व्यापक अवकाश खुले होणार आहे. या निमित्ताने आणखी काही पुस्तके प्रकाशित केली जाणार आहे. यात राखणदार ,सत्यापित,चंद्रलेखा बेलसरे,चक्र आणि इतर नाटके डॉ. सोमनाथ मुटकुळे,रॅगिंगचे दिवस : सुहास कोळेकर,ही पुस्तके देखील अंध वाचकांच्या हाती पडणार असल्याचे इंडियाना सुक्रो टेक प्रा. लि.चे संचालक प्रमोदकुमार बेलसरे यांनी सांगितले . यासाठी आमच्या कंपनीच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. आमच्या कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक दायित्व निधीतून पुस्तकांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वागत थोरात यांनी मुद्रणासाठी योगदान दिले आहे. सर्वसामान्य वाचकांप्रमाणे दृष्टिहीनांनाही उत्कट साहित्याची अनुभूती घेता येईल. साहित्य संमेलनात ब्रेल लिपीतील पुस्तक प्रकाशनाद्वारे सामाजिक जाण व साहित्यिक संवेदना यांचे अनोखे दर्शन साहित्यप्रेमींना होणार आहे.
वाड्मय, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीतून ब्रेल लिपीतील पाच नव्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. आपल्याकडे ज्ञानाचे प्रचंड भांडार आहे. ते ब्रेल लिपीच्या माध्यमातून दृष्टिहीन वाचकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संमेलनाच्या शताब्दीत सुमारे ५० ब्रेल पुस्तके प्रकाशित करण्याचा मानस असल्याचे
घनश्याम पाटील, मुख्य समन्वयक,प्रकाशन कट्टा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांनी सांगितले.



