महात्मा बसवेश्वर यांची ‘अक्षय’ विचारधारा सर्वात प्रभावी:- डॉ.बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर दि 19
क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला.त्यांचे जीवन व कार्य ( इ. स.११०५ ते इ.स. ११६५) संपूर्ण मानवजातीला दिशादर्शक असून त्यांची अक्षय विचारधारा जपण्यातच मानवतेचे कल्याण असल्याचे मत वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील बोरावके नगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबुराव उपाध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला डॉ. उपाध्ये यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सुखदेव सुकळे,संजय बुरकुले, सौ.सुरेखा बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले,सौ. वैष्णवी बुरकुले इत्यादींनी महात्मा बसवेश्वर व स्व. सौ. पुष्पाताई सुखदेव सुकळे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी डॉ. उपाध्ये यांना श्रमप्रतिष्ठा व प्रतिष्ठान कार्य पुस्तिका देऊन स्वागत केले.
प्रास्ताविक मनोगतात श्री सुकळे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षापासून अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांची जयंती एक समाजप्रबोधक
उपक्रम म्हणून साजरी केली जाते. श्रीचक्रधर स्वामी, श्रीसंत ज्ञानेश्वर आणि संत परंपरेच्या आधी महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक समतेचा आणि स्रीपुरुष सन्मानाचे विचार मांडून क्रांतीविचार मांडले. ही विचारधारा आचरणात आणणे गरजेचे असल्याचे सांगून डॉ. उपाध्ये यांचा परिचय करून दिला. डॉ. उपाध्ये यांनी ‘शोध: साहित्य बोध’ हा ग्रंथ सुखदेव सुकळे यांना भेट देऊन या पुस्तकातील महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन,कार्यलेखाचा आढावा घेतला. डॉ. निर्मलकुमार फडकुले,डॉ. र.बा. मंचरकर, अ. मा. देशपांडे, सुधाकर मोगलवार यांच्या विचारांचे संदर्भ स्पष्ट करीत डॉ. उपाध्ये यांनी महात्मा बसवेश्वर ह्यांनी विश्वकल्याणाची केलेली मागणी यांचा ऊहापोह केला.
त्यांच्या जीवनकाळाचे संदर्भ विविधतेने सांगितले जातात, परंतु १२ व्या शतकातील त्यांचे विचारधन हे अमृतधन असून ते कृतीत आणले पाहिजे, वीरशैव व लिंगायत असे भेद न मानता शुद्ध शिवभक्ती करावी आणि कर्मकांडाला दूर ठेवावे, हा त्यांचा विचार महत्वाचा असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सुखदेव सुकळे यांनी केले तर सौ.सुरेखा बुरकुले यांनी आभार मानले.


