मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास होणार अधिक वेगवान आणि सुरक्षित !

महाराष्ट्र दिनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण
लोणावळ:-पनवेल /प्रतिनिधी (श्रीनाथ (गणेश) लाड)-
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Expressway) प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करणारा बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्प आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
रविवारी एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणावळा येथील प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला.या प्रकल्पाचे जवळपास ९९ टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले असून सध्या अंतिम चाचण्या सुरू आहेत.

एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचे वर्णन “तंत्रज्ञानाचा चमत्कार” (Technological Marvel) असे केले आहे. या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वेळ साधारण २० ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे.या नवीन मार्गाचा वापर करण्यासाठी प्रवाशांकडून कोणताही जादा टोल आकारला जाणार नाही.
हा प्रकल्प केवळ रस्ता नसून अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
या प्रकल्पात २३.७५ मीटर रुंदीचे बोगदे बांधण्यात आले आहेत, जे जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानले जातात. टायगर व्हॅलीवर सुमारे १८० मीटर उंचीचा भव्य कॅबल स्टेड ब्रिज (Cable-stayed bridge) उभारण्यात आला आहे.
हा नवीन मार्ग खालापूर ते कुसगाव दरम्यान असून यामुळे बोर घाटातील नागमोडी वळणे आणि वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे. सुरुवातीच्या पहिल्या ३ महिन्यांसाठी या मार्गावरून फक्त चारचाकी वाहने आणि बस यांनाच परवानगी दिली जाईल.

या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आता पूर्णपणे ‘ॲक्सेस कंट्रोल’ होणार असून अपघात कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि एमएसआरडीसी, एफ्कॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.



